रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वाचा शासन आदेश जारी करत गट-अ मधील वैद्यकीय व आरोग्य सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दिनांक २२, ऑगस्ट, २०२५ रोजीच्या या आदेशानुसार, वेतनस्तर एस-२५ व त्यावरील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने घेण्यात आला आहे.
या आदेशान्वये, रत्नागिरी येथील जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अनिरुद्ध अच्युत आठल्ये यांची बदली उपसंचालक, आरोग्यसेवा (शहरी), मुंबई (रिक्त पदी) म्हणून प्रशासकीय कारणास्तव करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त होऊन नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये, तसेच जर एखादा अधिकारी वेळेवर हजर झाला नाही, तर त्याची अनुपस्थिती ‘अनधिकृत अनुपस्थिती’ मानली जाईल आणि त्याच्या सेवेत खंड पडेल, अशी सक्त ताकीद शासनाने दिली आहे. बदली आदेशात बदल करून घेण्यासाठी कोणताही अधिकारी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास तो शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.