पनवेल/ तुषार पाचलकर: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक विद्यालयात शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “राखीच्या धाग्यात एकतेचा गंध, आनंदाचा उत्सव, आपुलकीचा छंद” या भावनेला धरून, बंधू-भगिनींच्या पवित्र नात्याचा हा उत्सव औक्षणाच्या ज्योती आणि राखीच्या बंधनात संपन्न झाला.
विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. कैलास सत्रे सर आणि पर्यवेक्षक मा. श्री. कैलास म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, विद्यार्थिनींनी आपल्या बांधवांना राखी बांधून त्यांच्या सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी बांधवांनीही आपल्या भगिनींना भेटवस्तू देऊन प्रेम आणि आपुलकीचा धागा अधिक घट्ट केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या पारंपरिक पद्धतीसह त्यामागील सामाजिक संदेशही जपला. आजच्या आधुनिक काळात रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून, तो भावनिक बंध जपण्याचा, नात्यांना आधार देण्याचा आणि परस्पर सन्मान टिकवण्याचा एक सुंदर उत्सव आहे, असा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला.