रायगडात २४९ पोक्सो गुन्हे, ३० तपासाधीन; अल्पवयीनांच्या सुरक्षेचे आव्हान कायम

Gramin Varta
6 Views

रायगड: जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, मागील दीड वर्षात पोक्सो कायद्यांतर्गत तब्बल २४९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी २१९ प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यात पोलिसांना यश आले असून, ३० प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे.

विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

२०२५-२६ या वर्षात रायगड जिल्ह्यात पोक्सो अंतर्गत १६० गुन्हे दाखल झाले. या सर्व प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे. त्यानंतर १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांत आणखी ८९ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यापैकी ५९ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून, ३० प्रकरणे अद्याप तपासाधीन आहेत.

२०२५-२६ मध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे ११४ गुन्हे नोंदविण्यात आले होते. या सर्व प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. तर २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत बलात्काराचे ६२ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ४३ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. १९ प्रकरणांचा तपास सुरू आहे. विनयभंगाच्या घटनाही चिंताजनक आहेत. २०२५-२६ मध्ये ३९ गुन्हे दाखल झाले होते. २०२६ मध्ये जूनअखेरपर्यंत १८ गुन्हे नोंदविण्यात आले असून, ११ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे, तर सात प्रकरणे प्रलंबित आहेत. याशिवाय अल्पवयीन मुलींवरील छेडछाडीचा एक गुन्हाही तपासाधीन आहे.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये आरोपी पीडितेच्या ओळखीतील, नातेवाईक अथवा जवळच्या संपर्कातील असल्याचे तपासातून समोर येते. प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखविणे, विश्वासाचा गैरफायदा घेणे तसेच घरातील परिस्थितीचा फायदा उठविण्याच्या घटनांचाही त्यात समावेश आहे.

महिला व बालकांवरील गंभीर गुन्ह्यांचा तातडीने तपास करून आरोपींना अटक आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यावर रायगड पोलिसांचा भर आहे. लैंगिक गुन्हे करणाऱ्या व्यक्तींचा स्वतंत्र डाटा ठेवून त्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात आहे. अन्याय सहन न करता पीडितांनी अथवा त्यांच्या पालकांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Total Visitors :
4672179
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *