दापोली : मासेमारीस बंदी असलेला काळ ३० जुलैपर्यंत सुरू असतानाही हर्णे बंदरात परजिल्ह्यातून आलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सकडून बिनधास्त मासेमारी सुरू असून, स्थानिक मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “या बेकायदेशीर मासेमारीला अभय कोणाचे?” असा प्रश्न संतप्त मच्छीमारांनी उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १३) सायंकाळी हर्णे बंदराच्या आसपासच्या समुद्रात सुमारे १५ ट्रॉलर्स मासेमारी करताना दिसून आल्या. या नौका किमान ५ ते ६ नॉटिकल मैलांवरील समुद्रात मासेमारी करत होत्या. त्या नेमक्या कुठल्या जिल्ह्यातून आल्या आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
दरवर्षी १ जून ते ३० जुलै या कालावधीत राज्य सरकारकडून मासेमारीस बंदी असते. या कालावधीत समुद्रात मासळी प्रजननासाठी किनाऱ्याजवळ येते, तसेच पावसाळ्यामुळे समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ही बंदी अत्यंत आवश्यक मानली जाते.
परंतु यावर्षी हर्णे बंदरात ही बंदी धाब्यावर बसवली जात असून, परजिल्ह्यातील मच्छीमार ट्रॉलर्सनी बंदीचा फज्जा उडवला आहे. स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की, या नौकांनी आतापर्यंत आठ ते नऊ जाळ्यांमध्ये पापलेट मासळी पकडली असावी, असा अंदाज आहे.
मत्स्य व्यवसाय विभागाशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र अधिकारी अनुपलब्ध असल्यामुळे कोणतीही कारवाई झालेली नाही. स्थानिकांनी विभागाला लेखी व तोंडी माहिती दिली असली तरीही कारवाईचा मागमूस नाही.
या प्रकारामुळे हर्णेतील स्थानिक मच्छीमारांचे नुकसान होत असून, शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवणाऱ्या ट्रॉलर्सविरोधात तात्काळ कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दापोलीतील हर्णे बंदरात परजिल्ह्यातील हायस्पीड ट्रॉलर्सकडून बिनधास्त मासेमारी
