रत्नागिरी: पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी सांगता सोहळ्यानिमित्त ‘चैतन्यस्वर’ आणि ‘सहयोग रत्नागिरी’ येत्या २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता शतसंवादिनी २.० कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी २१ सप्टेंबरला १०० हून अधिक वादकांच्या साथीने शतसंवादिनी कार्यक्रम रत्नागिरीत पार पडला. याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यावर्षी कार्यक्रमाच्या पुढील भागाचे म्हणजे शतसंवादिनी २.० कार्यक्रमाचे आयोजन २० सप्टेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यामध्येही १०० हून अधिक संवादिनी वादक आणि तालवाद्य साथीदार सहभागी होणार होणार आहेत. कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून मोजकीच तिकिटे it’s my show या साइटवर तसेच नाट्यगृहावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यापासूनच दोन दिवसांमध्येच रसिकांनी ऑनलाइन बुकिंग करून प्रयोग जवळपास हाउसफुल केला आहे. रसिकांनी याच कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग आयोजित करावा, अशी मागणी केली आहे.
ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या कार्यक्रमाची निर्मिती ज्येष्ठ संवादिनीवादक आणि संगीतकार अनंत जोशी यांच्या संकल्पनेतून झाली आहे. गतवर्षी विविध रागांच्या सिम्फनी सादर झाल्या होत्या. सुप्रसिद्ध नाट्यगीतांवर आधारित हार्मोनियम सिम्फनी सादर केली जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन अनंत जोशी यांचे असून यामध्ये रत्नागिरीमधील सर्व हार्मोनियम शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे करणार असून तबलासाथ आदित्य पानवलकर व प्रथमेश शहाणे, तसेच इतर तालवाद्याची साथ अद्वैत मोरे आणि राघव पटवर्धन यांची असेल. संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनिसंयोजन एस कुमार साऊंड सर्व्हिसेच उदयराज सावंत आणि नेत्रदीपक रंगमंच व्यवस्था ओम साई डेकोरेटर्स अमरेश सावंत करणार आहे.
रत्नागिरीत २० सप्टेंबरला १०० संवादिनी वादक सादर करणार नाट्यगीतांची सिम्फनी
