दापोली: दापोली तालुक्यातील लाडघर येथून २९ जून २०२५ रोजी बेपत्ता झालेल्या मानसी गीतेश मस्कर (वय २३) आणि तिची लहान मुलगी रीशा गीतेश मस्कर (वय ०३) यांना २५ जुलै २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील तरवळ, मायंगडे वाडी येथून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. बेपत्ता माय-लेकींना सुखरूप त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती दापोली पोलीस स्थानकातर्फे देण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात होती. मानसी मस्कर आणि तिची मुलगी रीशा बेपत्ता झाल्यापासून दापोली पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. अखेर, त्यांच्या सुखरूप परतल्याने नातेवाईकांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
सदर शोध मोहिमेचे काम पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार आणि पोलीस शिपाई पारधी यांनी चोखपणे पार पाडले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच बेपत्ता माय-लेकींना शोधणे शक्य झाले, असे पोलिसांनी सांगितले.