खेड (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळजवळ खेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ६० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुटखा वाहतुकीसाठी वापरलेला चार लाखांचा टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडच्या दिशेने येणाऱ्या एका ‘बडा योद्धा अशोक लेलँड’ टेम्पोला वेरळ येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावर वाहन तपासणी करत असताना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत टेम्पो भरधाव वेगाने पुढे नेला.
यावेळी कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक येवले यांनी तात्काळ या टेम्पोचा पाठलाग केला आणि काही अंतरावर त्याला अडवले. टेम्पोची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर आणि उपनिरीक्षक येवले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्यामध्ये १४ पोती होती, ज्यात प्रत्येकी २२ पॅकेट असे एकूण ३०८ पॅकेट होते. या गुटख्याची अंदाजित किंमत ६०,९८४ रुपये आहे. यासोबतच, गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ४ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड टेम्पोही जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ४ लाख ६० हजार ९८४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी २१ वर्षीय अविनाश पारेकर (रा. बेवनूर) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत उपनिरीक्षक येवले यांच्यासह कॉन्स्टेबल तुषार झेंडे, प्रशांत माळी आणि हवालदार ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.