चिपळूण : तालुक्यातील सावर्डे बाजारपेठ येथील एसटी बस स्टॉपजवळ शुक्रवारी दुपारी भरधाव वेगाने आलेल्या एका आयशर टेम्पोने उभ्या असलेल्या एसटी बसला धडक दिली. या अपघातात एसटी बसचे किरकोळ नुकसान झाले असून, एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. दिव्या दीपक घाणेकर (रा. कोडमव्ठा, ता. चिपळूण) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास गोवा-मुंबई हायवे रोडवरील सावर्डे बाजारपेठ एसटी बस स्टॉप येथे चिपळूण आगाराची (एमएच २० बीएल १८६७ ) एसटी बस (चालक विजय बाबूराव राजेशिर्के) प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. ही बस दुर्गेवाडीहून चिपळूणकडे येत होती. प्रवासी दिव्या घाणेकर या बसमध्ये चढत असतानाच, सावर्डेकडून चिपळूणकडे भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ०८ सीपी २८३८) आयशर टेम्पोने एसटी बसच्या पाठीमागील उजव्या बाजूला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे एसटी बसचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, बसमध्ये चढत असलेल्या प्रवासी दिव्या घाणेकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या प्रकरणी, एसटी चालक विजय बाबूराव राजेशिर्के (वय ४६, रा. कडप मथलीवाडी, ता. चिपळूण) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी टेम्पो चालक प्रवीण हरिश्चंद्र पाटील (वय ४९, रा. पिंपळवाडा, पोस्ट कोप्रोली, ता. पेण, जि. रायगड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत.