गुहागर: महावितरण आणि एअरटेलने केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामाचा फटका आता एसटी महामंडळालाही बसू लागला आहे. शुक्रवारी (४ जुलै) सायंकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी गुहागर-तवसाळ एसटी बस नरवण-पंघरवणे येथे रस्त्याच्या बाजूच्या खोदलेल्या खड्ड्यात रुतली. सुदैवाने या घटनेत प्रवाशी असलेले ४० विद्यार्थी पूर्णपणे सुखरूप बचावले असून, कोणालाही दुखापत झाली नाही.
ही घटना सायंकाळी ४:४५ वाजताच्या सुमारास घडली. गुहागर-तवसाळ बस फेरी नरवण-पंघरवणे येथे समोरील वाहनाला बाजू देत असताना, रस्त्याच्या साईडपट्टीवरील खोदलेल्या भरावात अचानक रुतली. बसमध्ये ४० शालेय विद्यार्थी होते. घटनेची माहिती मिळताच, सर्व विद्यार्थ्यांना तातडीने आणि सुखरूपपणे गाडीतून बाहेर काढण्यात आले.
गुहागर आगाराने तात्काळ परिस्थितीची दखल घेत दुसऱ्या एसटीची व्यवस्था केली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवले. रुतलेली एसटी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती गुहागर आगाराचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली.
महावितरण आणि एअरटेलच्या या खोदाईमुळे सार्वजनिक वाहतुकीला मोठा धोका निर्माण होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सदर काम योग्य पद्धतीने न केल्यास भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता असून, ग्रामस्थांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारच्या बेजबाबदार कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.