पाली : लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषद व जयंतराव पाटील मित्रमंडळ, कुर्डू यांच्या संयुक्तविद्यमाने ग्रामरत्न सरपंच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात रत्नागिरी तालुक्यातील निवळीचे विद्यमान उपसरपंच संजय निवळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवळकर यांनी कोरोना काळात स्वखर्चाने मोफत रुग्णवाहिका व अन्य सामाजिक उपक्रम राबवलेले होते.
या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,यशदाचे माजी महासंचालक तथा माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे,अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील,उपाध्यक्ष शशिकांत मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे,पुणे महिला जिल्हाप्रमुख उज्वला गोकुळे, उत्तर पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब काळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना उपसरपंच संजय निवळकर म्हणाले की, खऱ्या अर्थाने हा सन्मान गांवच्या विकासात भरणार घालणारा आहे तसेच हा सन्मान माझा नसून आमच्या सर्व ग्रा.पं. सदस्यांचा व ग्रामस्थांचा आहे. खऱ्या अर्थाने गावचा सर्वांगीण विकास करणे हे एकच माझ्यासमोर उद्दिष्ट आहे आणि मिळालेल्या पुरस्कारामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळेल.माझ्या कार्याची दखल राज्य पातळीवर घेतली गेली आहे त्यामुळे आता सामाजिक जबाबदारी वाढली आहे.