GRAMIN SEARCH BANNER

‘मिशन शोध’ अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीला काढले शोधून!

Gramin Varta
624 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या ‘मिशन शोध’ या विशेष मोहिमेला एक मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेअंतर्गत काम करत असताना पोलिसांनी तब्बल नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा यशस्वीरित्या शोध लावला आहे. श्री. योगेश पुंडलिक खामकर नावाचे हे इसम सन २०१६ पासून बेपत्ता होते आणि आता ते सुखरूप सापडले आहेत.

मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील हरवलेल्या आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी “मिशन शोध” या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मिशनच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यांमार्फत युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या नापत्ता रजिस्टरमध्ये दाखल असलेल्या एका जुन्या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला. दिनांक ०५/०४/२०१६ रोजी रत्नागिरी शहरातील “कंदिल लॉज” मधून रुम नं. २०८ मध्ये आलेले ग्राहक श्री. योगेश पुंडलिक खामकर (वय ३७) हे ‘परत येतो’ असे सांगून लॉजला लॉक लावून निघून गेले आणि त्यानंतर परतलेच नाहीत. लॉजच्या मालकांनी आजूबाजूला शोध घेऊनही ते न मिळाल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली होती, त्यानुसार ०७/०४/२०१६ रोजी नापत्ता रजिस्टर नंबर २२/२०१६ दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास तात्कालिक तपासिक अंमलदार पोहवा/१४९७ प्रवीण वीर यांनी सुरू केला. त्यांनी सन २०२३ मध्ये श्री. खामकर यांची माहिती प्रसिद्ध करण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिसिंग पर्सन ब्युरो, गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, भायखळा, मुंबई-२७, यांना पत्रव्यवहार केला. यानंतर तपासिक अंमलदार पोहवा/१२४८ प्रमोद कांबळे यांनी तपास पुढे नेत श्री. खामकर यांच्या मुंबईतील एस.बी.एस. नगर, कांदपाडा, दहीसर, पुर्व येथील पत्त्यावर चौकशी केली असता, नापत्ता व्यक्ती त्या पत्त्यावर ये-जा करत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, श्री. योगेश पुंडलिक खामकर हे श्री. सखाराम गोरे यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी श्री. सखाराम गोरे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, नापत्ता इसम त्यांच्या एम.आय.डी.सी, लोटे (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील ‘मैफिल हॉटेल’ मध्ये कामाला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. त्यानुसार, तपासिक अंमलदार पोहवा/१२४८ प्रमोद कांबळे यांनी दिनांक १९/०९/२०२५ रोजी हॉटेल मैफिल, एम.आय.डी.सी लोटे येथे जाऊन खात्री केली. तेव्हा त्यांना धक्कादायक पण दिलासादायक माहिती मिळाली की, बेपत्ता असलेले श्री. योगेश खामकर हे सुमारे १ वर्षापासून श्री. सखाराम गोरे यांच्या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला असून त्यांच्याकडेच भाड्याने राहत आहेत. तब्बल नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले योगेश खामकर सुखरूप आणि चांगल्या नोकरीत असल्याचे स्पष्ट झाले.

पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील आणि विशेषतः तपासिक अंमलदार पो.हवा/१२४८ प्रमोद कांबळे यांनी ही मोलाची कामगिरी पार पाडली आहे. ‘मिशन शोध’च्या माध्यमातून रत्नागिरी पोलीस बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देत असून, पोलीस दलाच्या या संवेदनशील आणि प्रभावी कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3367853
Share This Article