GRAMIN SEARCH BANNER

लांजा: वाकेड घाटात भीषण अपघात; कंटेनरवर रिक्षा आदळून चालकासह चार महिला जखमी

Gramin Varta
315 Views

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात उभ्या असलेल्या कंटेनरला रिक्षाची मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकासह चार महिला प्रवासी जखमी झाल्या. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातातील गंभीर जखमी रिक्षाचालकाचे नाव अविनाश चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. कणगवली शिंदेवाडी, ता. लांजा) असे आहे. अविनाश शिंदे हा आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ बीसी ३२५६) घेऊन राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथे महिला प्रवाशांना घेण्यासाठी गेला होता. जाताना त्याने साटवली मार्गाचा वापर केला होता. परतीच्या प्रवासात चार महिला प्रवाशांसह तो ओणी मार्गे लांजाच्या दिशेने येत होता.

दरम्यान, रिक्षा वाकेड घाट परिसरात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच ४६ सीयू ०५७८) रिक्षाने मागून जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालकासह चार महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3368436
Share This Article