जलदुत शहानवाज शाह यांचे उपोषण मागे
गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर ते पोफळी दरम्यान वृक्षलागवड ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.
या मुद्द्यावर आज सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह, निसर्गप्रेमी समीर कोवळे, अजित जोशी, मंदार चिपळूणकर आणि दिगंबर सुर्वे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता नाझिम मुल्ला, सहाय्यक अभियंता शाम कुणेकर, तांत्रिक सल्लागार पंकज शर्मा तसेच मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी प्रसाद जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
शाह यांनी यावेळी सांगितले की, गुहागर ते रामपूर, साखरवाडी ते उक्ताड आणि बहादूरशेख ते पिंपळी दरम्यान रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. रामपूर ते साखरवाडी तसेच पिंपळी ते कुंभार्ली घाटमाथा या भागातील रस्ते हस्तांतरितही झाले आहेत. त्यामुळे चिपळूण शहर व परिसरातून जाणाऱ्या मार्गालगत वृक्षलागवड तातडीने करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वृक्षलागवडीच्या मुदतीबाबत विचारणा करताच, संबंधित अधिकाऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी संपूर्ण लागवड पूर्ण केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. हे आश्वासन मिळाल्यानंतर शाह यांनी आपले उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.