GRAMIN SEARCH BANNER

कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम अभ्यासण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतरांची पिसे, विष्ठा आदींचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञ समिती गठीत केली आहे.

नगर विकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा, पुणे येथील संचालक विजय कांदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

या निर्णयात म्हटले आहे की, विजय कांदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचे नगररचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे हे सदस्य सचिव आहेत. या समितीचे सदस्य म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे, प्राध्यापक व विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसिन एम्स नागपूरचे डॉ. प्रदीप देशमुख, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्राणी कल्याण मंडळाचे सचिव एस. के. दत्ता, फुफ्फुस तज्ज्ञ सुजित रंजन, डॉ. अमिता आठवले, आयसीएमआर, रोगप्रतिकारशक्ती तज्ज्ञ, डॉ. मनीषा मडकईकर, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. आर.जे. झेंडे, ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जेजे रुग्णालयाच्या सूक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा पाटील, मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांचा समावेश आहे.

समितीची कार्यकक्षा पाहिल्यास सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, कबुतरांच्या विष्ठेचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासणे, कबुतरांना नियंत्रित पद्धतीने अन्न देण्याची शक्यता व त्याचे परिणाम अभ्यासणे, संबंधित नियमावली तयार करणे, याचिकाकर्त्यांकडून प्राप्त निवेदनांचा अभ्यास करणे, अशी असणार आहे.

समितीने पहिल्या बैठकीपासून ३० दिवसांच्या आत आपला अहवाल सरकारला सादर करणे अपेक्षित आहे. हा निर्णय राज्यातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असून, लवकरच समिती प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणार आहे.

Total Visitor Counter

2474942
Share This Article