रत्नागिरी : श्री परशुराम दुध संकलन केंद्र, परचुरी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येशील शेतकर्यांचा दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वाधिक म्हैस दूध पुरवठा (साखरपा विभाग) व्दितीय क्रमांकाने केंद्राला पुरस्कृत करण्यात आले. वारणानगर येथे हा समारंभ पार पडला.
२१ ऑक्टोबर २०२१ रोजी या दूध संकलन केंद्राची स्थापना झाली. परचुरी पंचक्रोशी येथील काही लोकोच्या मनात ‘कोकणात दुध व्यवसाय सहकारी तत्वावर राबवणे’ ही संकल्पना होती. सुरुवातीला शेतकर्यांच्या व इतर संघाच्या सहाय्याने ४० लिटर दुधापासून सुरुवात झाली. सुरुवातीला मोजकेच १०-१५ शेतकरी होते. सध्याच्या घडीला येथे ४०-४५ शेतकरी दूध पुरवठा करीत असून मध्यंतरीच्या काळात हे संकलन दिवसाला ४०० लिटरपर्यंत पोहोचले आहे.
कोणतीही नवीन गुंतवणूक न करता उपलब्ध पशुधनामध्ये देखील हा व्यवसाय उत्तम प्रकारे साथ देऊ शकतो व कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो हे आता गावातील शेतकर्यांच्या हळूहळू लक्षात येत असून शेतकर्यांची संख्या वाढत जात आहे. भविष्यात शाश्वत प्रकारचा शेती व्यवसाय या दृष्टिकोनातून शेतकर्यांनी या व्यवसायाकडे पाहिले तर नक्कीच कोकणात रोजगार निर्मिती सुद्धा होईल व पशुधन संवर्धन सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकेल असे मत येथील शेतकर्यांनी व्यक्त केले.