रत्नागिरी (प्रतिनिधी): गोळप कट्टाच्या ऑक्टोबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारच्या ७२ व्या कार्यक्रमात रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध तबला, गायन विशारद आणि रत्नागिरीतील पहिले हार्मोनियम अलंकार असलेले श्री. विजय रानडे (मो.९४२२३७६२२२) यांनी आपला संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा हे मूळ गाव असलेल्या रानडे यांच्या आजोबांपासूनच त्यांच्या घरात गायन आणि कीर्तनकारितेची परंपरा होती. याच परंपरेचा वसा घेऊन त्यांचे वडील विनायकबुवा रानडे आणि काका भालचंद्रबुवा रानडे यांनी १८ ऑक्टोबर १९४४ या शुभदिनी कोकणातील पहिले संगीत विद्यालय रत्नागिरीत सुरू केले. योगायोगाने, ‘गोळप कट्टा’च्या कार्यक्रमाच्या दिवशीच या विद्यालयाला ८२ वर्षे पूर्ण झाली आणि आजही हे विद्यालय अविरतपणे सुरू आहे. वडील तबला-हार्मोनियमचे तर काका गायनाचे वर्ग घ्यायचे, हे बघत मोठे झाल्यामुळे वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासूनच विजय रानडे यांना तबला वादनाची आवड लागली.
रत्नागिरीतील संगीत परीक्षा केंद्र सुरू राहावे यासाठी त्यांचे वडील, काका आणि हिरेमठ सर खूप प्रयत्न करत असत आणि केंद्रासाठी आवश्यक असणारे पस्तीस परीक्षार्थी जमवण्याची धडपड त्यांनी जवळून पाहिली. १९९० पर्यंत ते केवळ तबला वाजवत असले तरी केंद्रासाठी त्यांनी हार्मोनियमच्या तीन परीक्षा दिल्या होत्या. १९९० मध्ये त्यांची दहावी झाली आणि त्याच दरम्यान वडील खूप आजारी पडले व अंथरुणाला खिळले. विद्यालय सुरू ठेवण्यासाठी त्यांना त्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात करावी लागली. याच काळात पालकांमध्ये संगीताचे महत्त्व वाढल्याने त्यांनी लहान मुलांना शिकवण्यावर लक्ष केंद्रित केले, कारण त्याच वयात मुलांमधील कला कळते.
१९९४ मध्ये विजय रानडे तबला विशारद झाले. हार्मोनियम हे पूर्वी फक्त साथ करण्याचे वाद्य आहे, या समजाला छेद देत त्यांनी सोलो वादनाचे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि १९९६ साली ते हार्मोनियम विशारद झाले. त्यानंतर अलंकार पदवीसाठी गुरुची अडचण आल्याने तब्बल वीस वर्षांनी, २०१६ मध्ये त्यांनी कोल्हापूर येथे परीक्षा देऊन हार्मोनियम अलंकार ही पदवी प्राप्त केली आणि रत्नागिरीतील पहिले हार्मोनियम अलंकार होण्याचा मान मिळवला. गंगाधर भाऊ पटवर्धन इंग्रजी शाळेत (जीजीपीएस) पहिले संगीत शिक्षक म्हणून स्व.अरुअप्पा जोशी यांनी त्यांना संधी दिली, जिथे त्यांनी क्लास आणि शाळेत शिकवण्यातील फरक अनुभवला. वर्गातील सगळ्या मुलांना संगीताची आवड लागावी यासाठी त्यांनी बडबड गीते, नवीन-जुनी गाणी, राष्ट्रभक्तीची गाणी आणि समूह गीते यांना छान चाली लावून उपक्रम केले. याच काळात ते स्वामी स्वरूपानंद यांच्या संजीवन गाथा मधील अनेक अभंगांना चाली लावून संगीतबद्ध करत होते. संगीतकार म्हणून त्यांची ओळख २००१ साली ‘खल्वायन’ संस्थेच्या ‘सं. घन अमृताचा’ या डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित नाटकासाठी संगीत दिल्याने झाली. स्पर्धेत हे नाटक पहिले आले आणि त्यांना संगीतकाराचा बहुमान मिळाला. त्यानंतर २००३ साली ‘सं. शांतिब्रह्म’ या नाटकासाठी त्यांना संगीतकार आणि ऑर्गन वादक अशी दोन बक्षिसे मिळाली, जी सहसा कुणाला दिली जात नाहीत, हा एक मोठा इतिहास घडला. मधल्या काळात वर्ग आणि शाळेमुळे संगीत नाटकापासून दुरावलेले रानडे २०२३ साली पुन्हा एकदा ‘संगीत मल्लिका’ या गायिका बेगम अख्तर यांच्या जीवनावरील नाटकासाठी संगीतकार म्हणून सन्मानित झाले.
ते आपल्या क्लासमधील जुन्या मुलांना नवीन मुलांना शिकवण्याची संधी देतात, ज्यामुळे त्यांचा स्वतःचा सराव उत्तम होतो, अशी पद्धत ते अवलंबतात. “शिष्य माझ्यापुढे गेले तर आनंद आहे,” या सकारात्मक भावनेने ते शिकवतात, म्हणूनच आज वरद सोहोनी, चैतन्य पटवर्धन यांसारखे शिष्य हार्मोनियममध्ये चांगले नाव कमावून आहेत. ‘शतसंवादिनी’ सारख्या कार्यक्रमात रत्नागिरीतील सत्तर मुले हार्मोनियम वाजवताना दिसतात, हे रत्नागिरीसाठी भूषण आहे, असे ते नमूद करतात. हल्ली मुले गुण (मार्क) मिळतात यासाठी संगीत शिकताना दिसतात आणि मुलांना सगळं झटपट हवं आहे. गाणी ऐकण्याऐवजी ‘पाहण्याची’ सवय लागल्यामुळे ‘गाणे कुठे पहायला मिळेल?’ असा मुलांचा प्रश्न असतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र जीजीपीएसच्या संगीत शिकणाऱ्या मुलांना खल्वायन संस्थेने दिलेल्या संगीत मैफिलीच्या संधीतून मुलांनी शास्त्रीय संगीत ते अभंग गायले आणि वाजवले, याचे त्यांना समाधान वाटते. कोरोना काळापासून ते नवीन गाणी संगीतबद्ध करून युट्यूब चॅनेलला ठेवत आहेत. संगीत हाच आपला आत्मा आणि आवड असल्याने तेच करत राहायचे आहे, अजूनही नवीन गोष्टी शिकत आहे, असे सांगत त्यांनी अनेक घटना, अनुभव आणि किस्से सांगितले. शेवटी श्रोत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी स्वामींचा संगीतबद्ध केलेला अभंग गायला. त्यानंतर श्रोत्यांमधील श्री. दिवेकर यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करून कार्यक्रमाची सांगता झाली.







