चिपळूण : जिल्हा आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाने लोकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे का? चिपळूण तालुक्यातील सावर्डे वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नायशी उपकेंद्रातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पॅरासिटोमोल गोळ्यांवर काळे ठिपके व बुरशीसदृश डाग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रुंगणासह नागरिकांतून संतापाचा भडका उडाला आहे.
वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नायशी येथील उपकेंद्रातील घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रुग्णांना निकृष्ट दर्जाच्या गोळ्या दिल्या जात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नायशीचे पोलीस पाटील प्रश्नांत पवार यांच्या मुलाला या गोळ्या देण्यात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. ११ ऑगस्ट रोजी त्यांच्या १२ वर्षीय मुलगा अंश पवारला सर्दी झाल्याने नायशी उपकेंद्रात तपासणीसाठी नेले असता येथील डॉक्टरांनी पॅरासिटोमोल गोळ्या दिल्या. मात्र या गोळ्या घेण्याआधी त्याने पाकीट फोडले असता त्यावर काळे ठिपके आणि बुरशी दिसून आली. त्यामुळे अंश याने गोळ्यांची एक्सपायरी डेट पाहिली असता त्या निकृष्ट आणि शरीरास हानी पोहोचणाऱ्या असल्याचे दिसून आले. ८ ऑगस्ट २०२४ रोजी तयार झालेल्या आणि ७ जुलै २०२६ पर्यंत वैध असलेल्या औषधांवर बुरशी आली हा धक्कादायक प्रकार समोर आला. हा साठा रत्नागिरी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून थेट जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आला होता. औषधे मुदतीत असूनही ती अशा अवस्थेत पोहोचली, यावरून साठवणूक, वाहतूक आणि गुणवत्ता नियंत्रणाची अवस्था दयनीय असल्याचे उघड झाले आहे.
संपूर्ण प्रकरणाची माहिती उपसरपंच संदीप घाग व डॉक्टरांना देण्यात आली. नायशी ग्रामपंचायतीकडून वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. दीपाली पांडे यांना पत्र पाठवून साठा त्वरित बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे – “शासन पुरवठ्यातील औषधांवर बुरशी येते म्हणजे रुग्णांच्या जीवाला काही किंमतच नाही का? अशा औषधांचा पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला दाखल करावा, तेव्हाच हा खेळ थांबेल,” अशी मागणी केली जात आहे.
सावर्डे नायशीत धक्कादायक प्रकार : उपकेंद्रातील औषधांवर बुरशी; रुग्णांच्या जीवाशी खेळ, नागरिक संतप्त
