चिपळूण : तालुक्यातील अलोरे-शिरगाव परिसरात दारूच्या नशेत दोन इसमांनी भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी केली. उभ्या असलेल्या तरुणाला मारहाण करून डोक्यात दगड घातल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत शिंदे आणि प्रवीण शशिकांत शिंदे (दोघे रा. कळकवणे फाटा, ता. चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर या हल्ल्यात तरुणाच्या डाव्या कानाच्या वरील भागाला गंभीर दुखापत झाली आहे.
पुष्पक नरसिंग शिंदे (वय २८, व्यवसाय-ड्रायव्हिंग, रा. नांदिवसे, राधानगर, ता. चिपळूण) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना ११ जुलै रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास दादर, चिपळूण येथील रामवरदायिनी मंदिरासमोरील अजित चव्हाण सलूनजवळ घडली.
फिर्यादी पुष्पक शिंदे आपल्या भाऊ प्रसाद शिंदे, चुलत भाऊ शशांक, वैभव आणि योगेश शिंदे यांच्यासह रस्त्यावर उभे होते. यावेळी अनंत शशिकांत शिंदे आणि प्रवीण शशिकांत शिंदे (दोघे रा. कळकवणे फाटा, ता. चिपळूण) हे दारूच्या नशेत तेथे आले.
पुष्पक शिंदे यांनी काही वेळापूर्वी प्रसाद शिंदे याच्यावर झालेल्या मारहाणीबाबत आरोपींना विचारणा केली असता, त्यांना राग अनावर झाला. त्यांनी संगनमताने पुष्पक यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आणि आरोपी अनंत शिंदे याने रस्त्यावरील दगड उचलून थेट त्यांच्या डोक्यावर फेकला. या हल्ल्यात पुष्पक यांच्या डाव्या कानाच्या वरच्या भागाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या विरोधात आवश्यक कारवाई सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.
चिपळूणमध्ये भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी, दारूच्या नशेत एकाच्या डोक्याला घातला दगड
