तेरा वर्षांपूर्वीच्या आंदोलन प्रकरणी चिपळूण न्यायालयाचा निकाल
चिपळूण: असुर्डे रेल्वेस्थानकासाठी झालेल्या आंदोलनाप्रकरणी गेल्या १३ वर्षांपासून चिपळूण न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल आज, शुक्रवारी न्यायदंडाधिकारी वर्ग १ चे न्यायाधीश वाय. सी. पाटील यांनी दिला. सबळ पुराव्याअभावी तत्कालीन खासदार आणि विद्यमान आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, सुभाष बने, गणपत कदम आणि तत्कालीन काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह एकूण २० जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे रेल्वेस्थानक व्हावे आणि परिसराचा विकास साधला जावा यासाठी काँग्रेसचे तत्कालीन चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. रेल्वे प्रशासन, केंद्र सरकार आणि लोकप्रतिनिधींकडे त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, अनेक वर्षे मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर सावंत यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानुसार, १० सप्टेंबर २०१२ रोजी भर पावसात असुर्डे रेल्वे ट्रॅकवर भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तत्कालीन खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, सुभाष बने, गणपत कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर उतरले. मुंबईहून मडगावला जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला अडवून, रेल्वे इंजिनसमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन इतके तीव्र बनले की आंदोलनकर्ते मागे हटण्यास तयार नव्हते. तब्बल २-३ तास भर पावसात हे आंदोलन सुरू होते. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून रेल्वे प्रशासनाला अखेर चर्चेची तयारी दर्शवावी लागली होती.
या आंदोलनामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवून तत्कालीन खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, सुभाष बने, गणपत कदम, संदीप सावंत, देवेंद्र उर्फ बंटी वणजू, दीपक रघुनाथ राऊत, सुहास भाटलेकर, इर्शाद वांगडे, अजित मारुती खेतले, विजय वसंत देसाई, प्रभाकर पांडुरंग जाधव, रामदास राणे, संदेश भालेकर, उत्तम साळवी, राजाराम पाष्टे, विश्वनाथ अनंत गुजर, निलेश खापरे, संतोष साळवी आणि प्रवीण साळवी अशा २१ जणांवर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२०१२ पासून हा खटला चिपळूण न्यायालयात सुरू होता. आंदोलकांच्या वतीने ॲड. भाऊ दळी, ॲड. नितीन केळकर यांच्यासह ॲड. एन. डी. भैरवकर आणि एस. एम. भोजने यांनी न्यायालयात बाजू मांडून जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाल्यानंतर, आज शुक्रवारी न्यायालयाने इर्शाद वांगडे याचा दावा वेगळा करत, उर्वरित २१ पैकी २० जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.
निकाल जाहीर होण्याच्या वेळी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. माजी आमदार राजन तेली वगळता आमदार नीलेश राणे, सुभाष बने, गणपत कदम यांच्यासह इतर सर्व आरोपी उपस्थित होते. या प्रकरणातील विश्वनाथ गुजर, उत्तम साळवी, विजय देसाई आणि राजाराम पाष्टे यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. या निकालानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.