GRAMIN SEARCH BANNER

रायगड: ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप्सद्वारे कोट्यवधींची फसवणूक; एकाला ठोकल्या बेड्या

Gramin Varta
159 Views

44 म्युल बँक खात्यांमधील तब्बल 19 कोटी 44 लाखांहून अधिक रक्कम गोठवली

अलिबाग : ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या एका रॅकेटचा पर्दाफाश रायगड सायबर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तब्बल 44 म्युल बँक खात्यांमधील तब्बल 19 कोटी 44 लाखांहून अधिक रक्कम गोठविण्यात आली आहे.

अलिबाग येथील अमित बापू जाधव (वय 37) यांना मोबाईलवर वारंवार ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सची जाहिरात दिसत होती. कायदेशीर असल्याचा भास झाल्याने त्यांनी एम-999, माधुर मटका, प्रीम-टीसीएच ही अ‍ॅप्स डाऊनलोड करून त्यात 10,000 रुपये गुंतवले. मात्र त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.

याबाबतची तक्रार दाखल होताच रायगड सायबर पोलिसांनी तपासात 25 पेक्षा जास्त ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप्स उघड केले आहेत. यात -एम-999, माधुर मटका, प्रीम- टीसीएच, बेटव्हीबी, कॅसिनो डे, ब्ल्यूचीप, तीनपत्ती, फोरेक्स, फोर रॅबिट यांसारख्या नावांचा समावेश आहे. हे सर्व अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर सहज उपलब्ध असल्याने अनेकांना ते कायदेशीर वाटत होते. म्हणून अनिल पवार यांनी आपल्या गुगल पे मधुन 10,000 रूपये ऑनलाईन गेम खेळण्यासाठी जमा केले. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही.

ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपवर बंदी असून सध्या सुरू असलेले गेमिंग अ‍ॅप हे भारतात बेकायदेशीर असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप व जाहिरात करणारे, सेवा देणारे, प्रोत्साहन देणारे, प्रेरीत करणारे यामध्ये सहभागी असणारे व्यक्ती अथवा कंपनी तसेच वित्तीय सेवा देणारे व्यक्ती विरूध्द कायदेशीर तकार केली. त्यानुसार रायगड सायबरकडे गुन्हा दाखल करण्यात आला.

रायगड सायबर पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेत तातडीने कारवाईला सुरुवात करत या अ‍ॅप्सशी संबंधित 44 म्यूल बँक खाती गोठविली. त्यामध्ये एकूण 19,44,03493/-रूपये गोठविण्यात आले आहेत.

यामध्ये एका आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात यश मिळाले आहे. आरोपीचे नाव भारमल हनुमान मिना असे असून तो उलियाना गांव जि. सवाई माधवपुरा राज्य-राजस्थान येथून अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हात आणखी पाच आरोपींचा रायगड पोलीस शोध घेत आहेत. अटक आरोपीच्या घरातील नातेवाईक यांचे वेगवेगळ्या बँकेत करेंट अकाउंट असून त्यांचा उपयोग वेगवेगळ्या अ‍ॅप्सद्वारे फसवणूक करून कमीशन स्वरुपात प्रतिदिवस एक लाख रूपयांची कमाई करीत असल्याचे दिसून आले. यामध्ये लहान वयोगटातील मुले देखील सदरचे अ‍ॅप दवारे पैसे गमविलेले आहेत.

भुवनेश्वर,ओरीसा यामध्ये 50,000 रक्कमेची फसवणूक झालेली आहे. त्यामध्ये सदरची रक्कम ही न्यूज 3,जी सर्व्हिस डायरेक्टर रमाकांत साह याच्या नावावर जमा झालेली आहे. तो मोबाईल शॉप चालवित आहे. विशेष म्हणजे सध्या अकाउंटवर शिल्लक एक लाख रुपये आढळून आले. त्यामध्ये गेले दोन महिन्यांमध्ये 56 कोटी रूपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुजाता साहू या महिलेच्या नावावर जे खाते आहे त्या खात्यावर दोन महिन्यांमध्ये 114 कोटी रूपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय रंजन बेहरा या सामान्य नागरिकाच्या नावावर जे खाते आहे त्यात 1.25 लाखाची शिल्लक असून, असे असून त्यामध्ये गेले दोन महिन्यांमध्ये 186 कोटी रूपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आल्याचे सायबरच्या तपासात निष्पन्न झालेले आहे. यामध्ये झएदखज ङींव. या कंपनीचे डायरेक्टर स्मितिका बोस व काही बँक अधिकार्‍यांचादेखील सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांचा यशस्वी सापळा

सायबर पोलीस स्टेशन रायगड-अलिबाग येथील निरीक्षक रिजवाना नदाफ व सहका-यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी भारमल मिना याला राजस्थानातून अटक करण्यात आली असून, अजून पाच जणांविरोधात शोधमोहीम सुरू आहे. या संपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक ऑचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांचे मार्गदर्शन लाभले.

या प्रकरणाने रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर अजून किती लोकांचे पैसे अशा बेकायदेशीर अ‍ॅप्समध्ये अडकले आहेत याचा शोध घेतला जात आहे.

म्युल बँक खाती म्हणजे काय

म्युल बँक खाती म्हणजे बेकायदेशीर काम करणार्‍यांसाठी वापरली जाणारी बँक खाती, ज्यात सामान्य नागरिकांच्या खात्यांचा वापर सायबर गुन्हेगार चोरी केलेले पैसे हलवण्यासाठी करतात. अशा खात्यांना ‘म्युल खाते’ म्हणतात आणि यात सहभागी होणे गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभाग मानले जाते, ज्यामुळे बँक तुमचे खाते ब्लॉक करू शकते आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Total Visitor Counter

2648144
Share This Article