रत्नागिरी : मुलगाच हवा या हव्यासापोटी आपल्याच एक महिन्याच्या चिमुरड्या मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या मातेला अतिरिक्त सत्र न्यायालय, चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आजन्म कारावास आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी दोन वर्षे सक्तमजुरी भोगावी लागेल. या खटल्यामध्ये सरकारने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
चिपळूण तालुक्यातील बहाल, घडशीवाडी येथे राहणारी आरोपी शिल्पा प्रवीण खापले हिने हे क्रूर कृत्य केले. शिल्पाला आधीच एक मुलगी होती आणि दुसऱ्यांदा मुलगा व्हावा अशी तिची तीव्र इच्छा होती. मात्र, दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने ती नाराज होती. ५ मार्च २०२१ रोजी तिचे पती रत्नागिरीला गेले असताना, दुपारी तिने आपल्या अवघ्या एक महिन्याच्या मुलीला पाण्याने भरलेल्या बादलीत उलटे बुडवून तिचा खून केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाल्यावर तिने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले आणि हा गुन्हा आपण केला नसल्याचा बनाव केला.
या घटनेनंतर सुरुवातीला सावर्डे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु, संपूर्ण परिस्थिती आणि पार्श्वभूमी तपासल्यानंतर हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भा.द.वि. कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला आणि आरोपी माता शिल्पा खापले हिनेच हे कृत्य केल्याचे सिद्ध केले. तपासाअंती तिच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. अनुपमा ठाकूर यांनी एकूण १५ साक्षीदार तपासले. आरोपीने मुलाच्या हव्यासापोटी आपल्याच मुलीचा कसा खून केला आणि त्यानंतर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, हे सिद्ध करण्यासाठी अॅड. ठाकूर यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे सादर केले. वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि शेजारी राहणाऱ्या साक्षीदारांची साक्ष निर्णायक ठरली. सर्व पुरावे आणि युक्तीवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी शिल्पा खापलेला दोषी ठरवले. न्यायालयाच्या या निकालानंतर, ‘मुलगा-मुलगी भेदभावातून’ झालेल्या एका क्रूर कृत्याला कायद्याने योग्य शासन मिळाले आहे.
चिपळूणमध्ये मुलाच्या हव्यासापोटी मुलीचा खून करणाऱ्या मातेला जन्मठेपेची शिक्षा
