GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणच्या मिलिंद साठे यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती; रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब

Gramin Varta
335 Views

नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. मिलिंद साठे यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यामुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद घटना ठरली आहे. विद्यमान महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारने साठे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक नागपूर येथे पार पडली. या बैठकीत सर्व सदस्यांचे एकमत होत मिलिंद साठे यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला.

बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर, पुढील व्यवस्था होईपर्यंत त्यांनी सरकारच्या विनंतीनुसार कामकाज पाहिले होते. दरम्यान, नव्या महाधिवक्त्याच्या नियुक्तीसाठी झालेल्या चर्चेत साठे यांचे नाव पुढे आले.

चिपळूण तालुक्यातील मालघर येथील रहिवासी असलेले मिलिंद साठे हे विधी क्षेत्रातील अनुभवी आणि नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षे वरिष्ठ वकील म्हणून काम केले असून, विविध महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे. त्यांच्या अनुभवाचा राज्य सरकारला मोठा लाभ होईल, असा विश्वास मंत्रिमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला.

ही नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील विधी क्षेत्रासाठी तसेच चिपळूणसाठी गौरवाची बाब मानली जात आहे.

Total Visitor Counter

3366863
Share This Article