कोल्हापूर : विदर्भाला कोकण जोडण्यासाठी राज्य शासनाने रत्नागिरी-नागपूर महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे जिल्ह्यातील काम रखडले आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास नऊ महिन्यांचाच कालावधी शिल्लक असताना, अवघे 23.20 टक्केच काम झाले आहे.
यामुळे मुदतीत हे काम पूर्ण होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी नागपूर महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रत्नागिरी जिल्ह्यातील मिर्या बंदर ते चोकाक पर्यंतचे काम आहे. हे काम तीन टप्प्यात सुरू आहे. यापैकी दोन टप्पे जिल्ह्यातील असून, एका टप्प्यात आंबा घाट ते पैजारवाडी आणि दुसर्या टप्प्यात पैजारवाडी ते चोकाक असे काम सुरू आहे. मिर्या बंदर ते चोकाक या सुमारे 195 कि.मी. कामपैकी 132 कि. मी.चे सरळ रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी जुन्याच रस्त्यावर आणि सरळ पातळीत काम करायचे आहे, ही कामे वेगाने पूर्णत्वाकडे चालली आहेत. मात्र, या मार्गावरील मोठे उड्डाण पूल, लहान पूल, बोगदे आदींचे काम अद्याप रखडलेलेच आहे.
जिल्ह्यातून जाणारा हा रस्ता अनेक वळणांचा आहे, तो अधिक सरळ केला जात आहे. यामुळे काही ठिकाणी तो गावांच्या बाहेरून नेण्यात आला आहे. वाघबीळ, आंबाघाट या परिसरात रस्ता सरळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगराचे खोदकाम केले जात आहे. वाघबीळ परिसरात मोठा उड्डाण पूल उभारला जात आहे. त्याचे काम महामार्गाने घालून दिलेल्या कालावधीत केले जाणार असल्याने हा उड्डाण पूल पूर्णत्वाला यायला आणखी पाच-सहा महिन्यांपेक्षाही अधिकचा कालावधी जाईल, अशीही शक्यता आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे 23 टक्के काम
