GRAMIN SEARCH BANNER

उद्धव ठाकरेंचा उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डींना पाठिंबा जाहीर

Gramin Varta
10 Views

मुंबई: आगामी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी हे
मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मातोश्री निवासस्थानी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रेड्डी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला, तसा मीच त्यांना फोन करून बी. सुदर्शन रेड्डींना पाठिंबा द्या, मतदान करा, असे सांगणार आहे. आमच्यात चमत्कार घडवण्याची ताकद आहे, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही सर्वांनी ठरवलेले आहे, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत, त्याला अधिक मजबुती येण्यासाठी आपण ही निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने लढवत आहोत. मी सुदर्शन साहेबांना धन्यवाद देतो, ते मुंबईत आले, मातोश्रीला आले. आमच्याकडून त्यांना पाठिंबा आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. इंडी आघाडी म्हणून एकजुटीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत. सुदर्शन साहेबांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केले. आता देशाला गरज आहे, ती म्हणजे सदसदविवेक बुद्धी जागी ठेऊन संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धी ठेऊन वागणारे उपराष्ट्रपती पाहिजेत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष, त्यांचे नेते एकदिलाने सोबत आहोत. चमत्कार चौकटीत होत नसतो, तो कसाही होऊ शकतो, म्हणून त्याला चमत्कार म्हणतात, असेही ठाकरे म्हणाले.

इंडी आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नाही, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, आवश्यक संख्याबळ नसलं, तरी देश विचित्र परिस्थितीत नेला जातोय. त्या परिस्थितीत जाण्यापूर्वी आपण थोपवू शकतो, आपली लोकशाही वाचेल. १००-१५० वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, त्या गुलामगिरीत देश जाणार नाही. संख्याबळावर निवडणूक अवलंबून असती, तर निवडणूक घेण्यात अर्थ नाही. मतदानात गोपनीयता आहे. त्यामुळे ज्यांच्या हृदयात छुप्या पद्धतीने देशप्रेम आहे, असे एनडीएचे खासदार देशासाठी मतदान करु शकतात.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला, ही गोष्ट सत्य आहे. माझा पक्ष फोडला, चोरला आणि आता पाठिंबा मागत आहेत. याचा काय अर्थ होतो? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी कोणी मागणी केली नव्हती, तरी आम्ही पाठिंबा दिला होता. ‘गरज असेल तेव्हा वापरा आणि नंतर फेकून द्या’, ही पद्धत आम्ही मान्य करणार नाही.

यावेळी सुदर्शन रेड्डी म्हणाले की, मी विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी मी मातोश्रीवर आलो. त्यांनी यापूर्वीच मला पाठिंबा जाहीर केला होता. त्याच्या साथीशिवाय हे शक्य नव्हते. मातोश्रीवर आल्यावर लक्षात आले की, देशहिताचे आणि महाराष्ट्रहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी झाले आहेत.

Total Visitor Counter

2652368
Share This Article