चिपळूण (प्रतिनिधी): भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला व नैसर्गिक वारशांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन क्षेत्रातील अग्रगण्य देशव्यापी स्वयंसेवी संस्था ‘भारतीय संस्कृती व कला निधी’ (इन्टॅक) आता कोकणातही सक्रिय होत आहे. देशभरात २१५ हून अधिक शाखांच्या माध्यमातून पुरातन ऐतिहासिक वारशांबाबत जनजागृती, हेरीटेज वॉक, दस्तऐवजीकरण आणि पारंपरिक कलांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘इन्टॅक’ संस्थेच्या कोकण अध्यायाच्या शुभारंभाच्या दिशेने पहिले पाऊल पडले असून, पहिला कार्यक्रम म्हणून सुप्रसिद्ध पुरातन श्री क्षेत्र कर्णेश्वर देवस्थान, मौजे कसबा (ता. संगमेश्वर) येथे विशेष वारसा अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
मौजे कसबा गाव परिसरस्थित प्राचीन श्री कर्णेश्वर मंदिर समूह व श्री कालभैरव मंदिर समूह या ऐतिहासिक वास्तूंची सहभागी अभ्यासकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या वारसा अभ्यास सहलीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुश्री सायली पलांडे-दातार यांनी अभ्यासपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी मंदिर संकुल, वास्तूंवरील मूर्तीशिल्पकला, कोरीव नक्षीकाम, चित्ताकर्षक कलाकुसर, हस्तकारागिरी तसेच त्याबाबतचा इतिहास, पुरातत्त्व, विज्ञान आणि धार्मिक अध्यात्म अशा विविध अंगांनी सखोल संशोधनात्मक माहिती दिली.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चिपळूण येथील नाणे संग्राहक गौरव लवेकर यांनी आपल्या संग्रहातील दुर्मिळ नाण्यांचे विशेष प्रदर्शन मांडले होते; तसेच नाण्यांच्या ऐतिहासिक मूल्यावर छोटेखानी व्याख्यान देऊन उपस्थितांना माहिती दिली. या अभ्यास सहलीमध्ये जनता विद्यालय, आंगवलीचे विद्यार्थी तसेच चिपळूण येथील डी. बी. जे. कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.
या महत्त्वाच्या उपक्रमात अजित राणे, डॉ. गौरव बारटक्के, नेहा राणे, विजय मोरे, पंकज दळवी, कुणाल आणेराव, सिद्धेश लाड, गजानन चितळे, समीर कोवळे, विलास काणे, विनीत विचारे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतील मान्यवर अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणातील समृद्ध वारसा संवर्धनाच्या दृष्टीने हे पहिले पाऊल अत्यंत दिशादर्शक ठरले आहे.





