मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११,००० पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे.
मागील ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलीस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले.
पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्रात ११ हजार जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस भरतीच्या मान्यतेकरीता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये भरतीला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल. या भरतीमध्ये बँड समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई तसेच राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार पदांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. थोडक्यात तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात, त्याच जिल्ह्यातून अर्ज भरता येईल.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. या प्रस्तावावर ३० सदस्यांनी मत व्यक्त केले आहे. यावर विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. काहींना प्रस्तावावर टीका देखील केली. मी बिझनेस ॲडव्हायझरीच्या कमिटीत बसलो होतो. अलीकडच्या काळात प्रस्तावात एवढे विभाग समाविष्ट केले जातात, की न्याय मिळत नाही, असे विरोधी पक्षातील काही सदस्यांनी सांगितले. तेव्हा दोन किंवा चार विभाग असावेत अशी चर्चा झाली होती. पण दुर्दैवाने विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावात मात्र एकही खातं सोडलं नाही. विरोधी पक्षात काम करण्याची सवय असल्यामुळे किती खात्यांवर चर्चा उपस्थित करायला हवी याचे नियोजन करायला हवे. अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा आहे तेव्हा मी आणि आपल्या सगळ्यांत वेदना आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात ११,००० पदांसाठी पोलीस भरती होणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
