भाट्ये पुलावर संरक्षित प्रजातींच्या अवशेषांची सर्रास साठवणूक
रत्नागिरी: एकीकडे जगभरात १४ जुलै रोजी जागतिक शार्क जनजागृती दिन उत्साहात साजरा केला जात असताना, दुसरीकडे रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये पुलावर शार्क माशांचे मत्स्यपर उघड्यावर वाळत घातल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. यामुळे केवळ स्थानिक पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर सागरी जीवसंवर्धन कार्यकर्त्यांमध्येही तीव्र संतापाची लाट उसळली असून, वनविभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शार्क मासे आणि त्यांचे अवयव हे वन्यजीव संरक्षण कायदा तसेच २०१३ सालच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या धोरणानुसार संरक्षित प्रजातींमध्ये समाविष्ट आहेत. शार्कच्या मत्स्यपरांची आयात आणि निर्यात पूर्णपणे बेकायदेशीर असतानाही, राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये हे मत्स्यपर सर्रासपणे आढळून येत असल्याचे चित्र आहे. हा केवळ कायद्याचा भंग नाही, तर सागरी पर्यावरणासाठी मोठा धोका आहे.
सोमवारी सकाळी भाट्ये पुलाजवळ एका व्यक्तीला शार्कचे मत्स्यपर वाळत घालताना पाहिल्यानंतर स्थानिकांनी विचारणा केली. त्यावेळी त्याने, “हे माशाचे पाक असून, त्याचा धागा तयार होतो,” असे उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, शार्कच्या परांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असल्याने मोठा व्यापारी लाभ मिळतो. त्यामुळे अशा प्रकारची उत्तरे केवळ फसवणूक असून, ही अवैध तस्करीची शक्यता असल्याचा दावा पर्यावरण कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आग्नेय आशियाई देशांमध्ये या परांना मोठी मागणी असल्याने, स्थानिक तस्कर ग्रामीण आणि अज्ञानी लोकांना हाताशी धरून अशा वस्तूंची साठवणूक आणि तस्करी करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिकांना या बेकायदेशीर कृत्याचे गांभीर्य कळत नसल्याने, ते नकळतपणे या साखळीचा भाग बनत आहेत.
२०१९ ते २०२० या काळात मॅंग्रोव्ह फाऊंडेशनने केलेल्या महत्त्वपूर्ण अभ्यासातून राज्यातील सागरी जीवसृष्टीतील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या अभ्यासानुसार, राज्यातील सात बंदरांवर ३१ प्रकारच्या इलास्मोब्रान्च प्रजाती (शार्क, पाकट व गिटार फिश) सापडल्या होत्या. त्यापैकी ८ प्रजातींच्या मत्स्यपरांची स्पष्ट नोंद करण्यात आली, जी अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे अभ्यासात नमूद केले आहे. हा अभ्यास राज्यात शार्क आणि त्यांच्या अवयवांचा अवैध व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दर्शवतो.
भाट्ये पुलावर उघडकीस आलेल्या या प्रकाराची वनविभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने दखल घेऊन सखोल तपास करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीकडे हे मत्स्यपर आढळले, त्याची पार्श्वभूमी तपासणे, हे पर कुठून आले आणि कोणासाठी ठेवण्यात आले होते, याचा खुलासा होणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ कारवाई करून थांबता कामा नये, तर यामागे कार्यरत असलेल्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे. जागतिक शार्क जनजागृती दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी अशा घटना समोर येणे, हे आपल्या सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना थेट आव्हान आहे. शार्क माशांचा अवैध व्यापार हा केवळ आर्थिक गुन्हा नसून, तो पर्यावरणीय गुन्हा आहे. प्रशासन आणि स्थानिक जनतेला या गंभीर समस्येची जाणीव करून देऊन, कठोर पावले उचलण्याची आता खरी वेळ आली आहे. अन्यथा, भविष्यात आपल्या सागरी परिसंस्थेचे अपरिमित नुकसान होण्याची भीती आहे.