पाचल/अंकुश पोटले: राजापूर तालुक्यातील निसर्गरम्य काजिर्डा धबधब्याला आता पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने काजिर्डा ग्रामपंचायतीला याबाबत अधिकृत पत्र पाठवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना केली आहे. या धबधब्याच्या विकासासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील बारमाही वाहणाऱ्या पाच प्रमुख धबधब्यांमध्ये काजिर्डा धबधब्याचा समावेश होतो. हा धबधबा पडसाळी (कोल्हापूर जिल्हा) गावातील घाटमाथ्यावरून उगम पावून काजिर्डा गावात डोंगरमाथ्यातून खाली येतो. पडसाळी गावात याच नदीवर धरण बांधलेले असले तरी, त्यातून झिरपणारे पाणी बारमाही या धबधब्यातून वाहत असते.
त्यामुळे उन्हाळ्यातही हा धबधबा प्रवाहित राहतो. पावसाळ्यात तर दुथडी भरून वाहणाऱ्या या धबधब्याचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. ‘मुसळ्याचा धबधबा’ म्हणूनही याची ओळख आहे.
या धबधब्याच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नाही. जमिनीच्या आतून वाहणाऱ्या या पाण्याच्या झऱ्यांमुळे विहिरी आणि नद्यांनाही बारमाही पाणी उपलब्ध असते. यामुळे शेतकरी उन्हाळ्यातही भात, भुईमूग, मिरची, टोमॅटो, वांगी, मुळा आणि पालेभाज्यांसारखी पिके घेऊ शकतात.
काजिर्डा धबधब्यामुळे गावातील पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे. या भागात अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळे आहेत, ज्यात शिवकालीन व पौराणिक लेणी, पांडवकालीन तलाव, शिवकालीन मुडा गड, वाघ बिळ, म्हातार धोंड (ज्याला आवाज दिल्यास प्रतिध्वनी उमटतो) यांचा समावेश आहे. शासनाने मंजूर केलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीचा योग्य वापर केल्यास ही सर्व स्थळे विकसित होऊन पर्यटकांना आकर्षित करतील आणि त्यातून स्थानिकांना रोजगारही मिळेल. पर्यटन विभागाने या निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या विकासामुळे काजिर्डा परिसराचा कायापालट होण्यास मदत होईल.