तुषार पाचलकर / राजापूर
तालुक्यातील प्रिंदावन गावाच्या मानवाडी सड्यावर शुक्रवारी एका नर रानगव्याचा मृतदेह आढळून आला. वनविभागाच्या प्राथमिक तपासणीनुसार, या रानगव्याचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रिंदावन गावातील ग्रामस्थ डॉ. घाटे यांनी रानगवा मृतावस्थेत आढळल्याची माहिती राजापूर वनविभागाला दिल्यानंतर वनपाल व वनरक्षकांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी भेट दिली. सदर रानगवा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे ११ ते १२ वर्षे आहे.
घटनास्थळी वनविभागासोबतच पशुधन विकास अधिकारी श्री. चोपडे यांनीही भेट देत रानगव्याचे शवविच्छेदन केले. या तपासणीत शिकार किंवा विषबाधेचे कोणतेही ठोस संकेत न मिळाल्याने मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली रानगव्याचा मृतदेह नियमांनुसार जाळून नष्ट करण्यात आला.
या कार्यवाहीसाठी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार तसेच रेस्क्यू टीमचे नितेश गुरव, सत्यवान तळवडेकर, रमेश बिर्जे, अक्षय गुरव, पांडुरंग गोंडाळ आणि प्रशांत राऊत उपस्थित होते.