GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डावर ‘सहकार पॅनल’चे एकहाती वर्चस्व; १७ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ने १७ पैकी तब्बल १६ जागा जिंकत दणदणीत विजय संपादन केला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि जिल्हा सहकारी बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलने ही निवडणूक लढवली होती.

विशेष म्हणजे, सहसा बिनविरोध होणाऱ्या या निवडणुकीत यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडून सहकार पॅनलविरोधात उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र, लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उबाठा गटाने आपले सर्व उमेदवार मागे घेतले. यामुळे सहकार पॅनलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात रामचंद्र गराटे, प्रभाकर शेट्ये, चंद्रकांत परवडी, रमेश दळवी, अविनाश जाधव, सिराज घारे, सुनील टेरवकर, प्रताप सावंत, प्रसन्न दामले, सुरेंद्र लाड, मनोज कदम, हेमंत वणजु, स्मिता दळवी आणि प्राची टिळेकर यांचा समावेश होता.

तरीही, अखेरच्या दिवशीही सहकार पॅनलविरोधात तीन उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यामुळे ५ जुलै २०२५ रोजी उर्वरित तीन जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाल्यावर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. जिल्हाभरातील मतदारांनी मोठ्या उत्साहात रत्नागिरीत येऊन मतदानाचा हक्क बजावला. या तीन जागांपैकी सहकार पॅनलचे नितीन कांबळे आणि सीताराम लांबोरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

या दणदणीत विजयानंतर विजयी उमेदवारांचे जिल्ह्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी अभिनंदन केले. या संपूर्ण निवडणुकीत आमदार शेखर निकम आणि दापोली अर्बन बँकेचे जयवंत जालगावकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे सहकार पॅनलकडून सांगण्यात आले. या विजयामुळे रत्नागिरीच्या सहकार क्षेत्रावर सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

- Advertisement -
Ad image

Total Visitor

0217426
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *