चिपळूण (प्रतिनिधी): सध्याच्या काळात समाजामध्ये धार्मिक तेढ वाढलेली असताना, चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील तरुण उद्योजक अरशद शेख यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे उदाहरण सादर केले आहे. त्यांनी स्वत: गणपती आरती संग्रह पुस्तक प्रकाशित करून समाजात एक चांगला संदेश दिला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सायंकाळी भाजप नेते आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते साई मंदिर येथे करण्यात आले.यावेळी उद्योजक नासिरभाई खोत, प्रशांत यादव, अरशद शेख, हिदायत कडवईकर आणि प्रशांत यादव यांचे स्वीय सहाय्यक गुलजार गोलंदाज उपस्थित होते.
हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या समन्वयाचे प्रतीक
अरशद शेख यांनी प्रसिद्ध केलेल्या या आरती संग्रहामध्ये विविध गणपती आरत्यांचा समावेश आहे. हा उपक्रम केवळ धार्मिक सद्भावनाच नाही, तर आपल्या देशाच्या गंगा-जमुनी तहजीबचे एक सुंदर प्रतीक आहे. समाजात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. एका मुस्लिम तरुणाने हिंदू धर्माशी संबंधित पुस्तक प्रकाशित केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.