गुहागर : राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव सध्या वानप्रस्थाश्रमाच्या विचारात आहेत. आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावेसे वाटते, असे उद्गार भास्कर जाधव यांनी काढले आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या विधानांना नाराजीची किनार असल्याचे स्पष्ट दिसते. आपल्या आक्रमक वाणीतून विरोधकांना घायाळ करून सोडणारे नेतृत्व सध्या राजकारणातल्या निवृत्तीविषयी बोलून ‘संधी मिळत नसेल तर बाजूला व्हावे’, हे तर सुचवू पाहत नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भास्कर जाधव कोकणातले नेते परंतु त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सभागृह गाजवणारे फर्डे वक्ते, सभा संमेलनांतून प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडणारे परंतु त्याचवेळी सरकारच्या चांगल्या कामाची वाहवा करणारे असे सर्वव्यापी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक वर्षे काम केले. शरद पवार यांनीही त्यांना मंत्रिपदाची संधी दिली, अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधीही दिली. परंतु काही कारणांनी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दुसऱ्यांदा प्रवेश केला. पहिल्या फडणवीस यांच्या सरकारमधये तसेच नंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु पक्षाने त्यांना डावलले. याचीच बोच भास्कर जाधव यांना लागून राहिली आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी मंत्रिपदाची खंत अनेक वेळा उघड उघड बोलून दाखवली आहे. त्यांच्या पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चा होत असतानाच त्यांनी निवृत्तीचे संकेत देणारे विधान रविवारी केले.
आता थांबावस वाटतय… भास्कर जाधवांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Leave a Comment