गाव विकास समिती कडून छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : कोकणातील उद्योग आणि रोजगाराच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. संघटन प्रमुख सुहास खंडागळे आणि अध्यक्ष उदय गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा घेण्यात येत असून, कोकणाच्या उद्योग-रोजगाराच्या भवितव्याबाबत तरुणाईसह नागरिकांनी आपले विचार मांडावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
यंदाच्या स्पर्धेसाठी “कोकणात उद्योग व रोजगार न वाढण्याची कारणे” हा विषय देण्यात आला आहे. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्ती, समुद्रकिनारा, पर्यटन, शेती, मत्स्यव्यवसाय तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध असतानाही अपेक्षित प्रमाणात औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मिती का झाली नाही, याचा चिकित्सक आढावा स्पर्धकांना निबंधातून मांडता येणार आहे.
निबंधासाठी विशेषतः “कोकणात उद्योग व रोजगार न वाढण्याची कारणे” मांडताना,राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, कोकणविरोधी उद्योग धोरण आणि उद्योगविरोधी कोकणी मानसिकता या तीन मुद्द्यांचा विचार करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उद्योग उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, परवानगी प्रक्रिया, स्थानिक पातळीवरील अडथळे, पर्यावरण आणि विकास यातील समतोल, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी तसेच उद्योगांसाठी आवश्यक असलेले अनुकूल वातावरण याबाबतही स्पर्धकांना आपले स्वतंत्र मत मांडता येणार आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणावर तरुण रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आणि अन्य शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. स्थानिक पातळीवर उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास हे स्थलांतर काही प्रमाणात रोखता येऊ शकते. त्यामुळे उद्योगवाढीसाठी सरकार, लोकप्रतिनिधी, प्रशासन, उद्योजक आणि स्थानिक समाज यांची भूमिका काय असावी, यावरही निबंधातून भाष्य करण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी १,००० शब्दांचा, शुद्ध आणि सुंदर अक्षरातील निबंध लिहिणे अपेक्षित आहे. निबंध ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आयोजकांकडे पाठवायचा आहे. निबंध पाठविण्याचा पत्ता सौ. दिक्षा रविंद्र खंडागळे, देवरुख कॉलेजच्या पाठीमागे, सिद्धिविनायक नगर, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी असा आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ५,५५५ रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी ३,३३३ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय एकूण पाच उत्तेजनार्थ बक्षिसेही दिली जाणार आहेत.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सौ. दिक्षा खंडागळे – ९४०४१ ५८३८४ किंवा नितीन गोताड – ९३२२५१६८८६ यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
कोकणातील उद्योग, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता आपल्या विचारांना शब्दरूप देण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, तरुणांनी तसेच कोकणाच्या विकासाबाबत आस्था असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे यांनी केले आहे.
कोकणातील उद्योग-रोजगाराच्या प्रश्नांवर विचार मांडण्याची संधी
Leave a Comment






