अपघात घडल्यास जबाबदार कोण?
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेने उत्पन्न वाढीसाठी शहरातील डिव्हायडरवर लावलेले बोर्ड कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. नुकताच मारुती मंदिर येथे हॉटेल जाहिरातीसाठी लावण्यात आलेला बोर्ड मुळासहित उन्मळून पडला आहे. सुदैवाने हा बोर्ड डिव्हायडरवरच अडकल्याने अपघाताचा धोका टळला. अन्यथा हाच बोर्ड एखाद्या दुचाकी अथवा कारवर पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उत्पन्नासाठी जाहिराती लावायच्या आणि देखभाल पूर्णपणे दुर्लक्षित करायची, हेच सध्या रत्नागिरी नगर परिषदेचे धोरण झाले आहे का, असा प्रश्न शहरवासीय विचारू लागले आहेत. जाहिरातीचा बोर्ड नुकताच कोसळला. सुदैवाने मोठा अपघात टळला, पण उद्या हाच बोर्ड वाहन चालकाच्या डोक्यात पडल्यास जबाबदार कोण?
नगर परिषदेने उत्पन्न वाढीच्या नादात शहरातील डिव्हायडरवर मोठमोठे लोखंडी बोर्ड लावले आहेत. आठवडा बाजार, एस.टी. स्टँड, मारुती मंदिर, साळवी स्टॉप या सर्व मार्गांवर ही बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र, त्यांची कुठलीही देखभाल होत नाही. काही बोर्ड गंजलेले, काही हललेले, आणि काही अक्षरशः कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
मारुती मंदिर कार्निवल हॉटेल समोर जाहिरातीसाठी लावलेला फलक मुळासहीत कोसळून पडला आहे. जर तो फलक एखाद्या दुचाकीस्वारावर, चारचाकीवर पडला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. अशा परिस्थितीत अपघातास जबाबदार कोण? नगर परिषद की तो वाहन चालक?
या फलकांमधून नगर परिषदेचे लाखो रुपयांचे उत्पन्न होते. मात्र त्याबरोबरच दुरुस्तीची जबाबदारीही येते. शहरातील मुख्य रस्त्यांवर हजारो वाहने दररोज धावत असताना, डिव्हायडरवर असलेल्या अस्थिर, गंजलेल्या फलकांमुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. पण नगर परिषद मात्र ‘अपघात घडल्यावर बघू’ या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
पैसे नगर परिषद घेते, पण वाहन चालकांच्या जीवाचे काय?
नगर परिषदेने आपल्या उत्पन्न वाढीसाठी फलक लावले आहेत. मात्र शहराचे विद्रुपीकरण केले आहे. डिव्हाईडरवर लावलेले फलक अपघातास कारणीभूत ठरत आहेत. जर अपघात झाला, तर त्याची जबाबदारी प्रशासन स्वीकारणार का? उलट वाहनचालकालाच दोष दिला जाईल. उत्पन्न नगर परिषद घेते आणि बळी सामान्य माणसाचा?
शहरातील अनेक वाहन चालकांनी या अनियमिततेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “फक्त पैसे कमवण्याचा उद्योग, पण देखभाल शून्य. उद्या एखादा जीव गेला, तर काय नगर परिषद जबाबदारी घेणार?” असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारला जात आहे.
या गंभीर प्रकारावर तातडीने उपाय न केल्यास, भविष्यात एखादा जीव गेला तर प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, आणि नागरिक कायदेशीर कारवाईचाही मार्ग अवलंबतील, असा इशारा वाहन चालकांतून दिला जात आहे.
मारुती मंदिर येथे जाहिरातीचा बोर्ड मुळासहित कोसळला; रत्नागिरी नगर परिषदेचा निष्काळजीपणा
