GRAMIN SEARCH BANNER

मुंबई विद्यापीठाचा निर्णय; विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची संधी

Gramin Varta
10 Views

मुंबई: मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार असून हा उपक्रम व्यस्त जीवनशैली असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

यासाठी विद्यापीठाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांसोबत करार केला असून सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाला यामध्ये अग्रक्रमाने स्थान देण्यात आले आहे.

या उपक्रमाची माहिती मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांनी सोमवारी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रा. अनिल बनकर, प्रा. दिलीप भारमल, प्रा. मंदार भानुसे, डॉ. लीलाधर बन्सोडे, प्रा. सुभाष वेलिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सरगर यांनी सांगितले की, “धकाधकीच्या जीवनात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. १२ वी नंतर किंवा पदवीनंतर विद्यार्थी हे शिक्षण घेऊ शकतात.” या उपक्रमांतर्गत २८ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. एका पदवीसाठी ७५ टक्के उपस्थिती आवश्यक आहे, तर दुसऱ्या पदवीसाठी उपस्थितीची अट नसणार आहे. याशिवाय संबंधित अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहेत.

या अभ्यासक्रमांमध्ये बीए, बीकॉम, बीएस्सी (आयटी व संगणकशास्त्र) तसेच एमए, एमकॉम, एमएस्सी, एमएमएस, एमसीए आणि पीजीडीएफएमसह विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये समाजशास्त्र या विषयाचा एमए अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार आहे.

कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी सहायता केंद्रे (एलएससी) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री पंचम खेमराज महाविद्यालयासह शिरगावचे पुंडलिक अंबाजी कारले महाविद्यालय, वेंगुर्ल्याचे डॉ. बाबासाहेब खर्डेकर महाविद्यालय, कुडाळचे संत राऊळ महाराज महाविद्यालय, दोडामार्गचे लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, मालवणचे एसकेपीएस वाणिज्य व डीएसजी विज्ञान महाविद्यालय, कणकवली महाविद्यालय, आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय व फोंडाघाटचे कला व वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालयांचा यात समावेश आहे.

या कराराच्या निमित्ताने श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले तसेच मान्यवर प्राचार्य उपस्थित होते.अधिक माहितीसाठी विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसराशी संपर्क साधू शकतात, असे डॉ. सरगर यांनी सांगितले.

Total Visitor Counter

2647333
Share This Article