GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: पाचल येथे गोवंश वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

Gramin Varta
959 Views

राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक आणि कत्तलींना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. अवैध मार्गाने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक २२ सप्टेंबर रोजी लांजा उपविभागात गस्त घालत असताना त्यांना राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचल ते जवळेथर रोडने गगनबावडा घाटामार्गे अवैध गोवंश वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने पाचल येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली.
या तपासणीदरम्यान, MH-08-AP-0254 क्रमांकाची टाटा कंपनीची गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीच्या हौद्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने, दोरीने बांधलेली एकूण १३ गोवंश जनावरे आढळून आली. या जनावरांना पाणी आणि चारा न देता, वेदना होतील अशा अवस्थेत त्यांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती.

पोलिसांनी गाडीच्या चालकाकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे गोवंश वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा पशु-वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे १) सलमान मुस्ताक बलबले (वय ३५, रा. बलबले मोहल्ला, राजापूर) आणि २) संजय दत्तराम पाटणकर (वय ४८, रा. कुंभवडे रामणवाडी, राजापूर) अशी आहेत. चौकशीत त्यांनी ही जनावरे तळगाव कोंडे येथील काजी मोहम्मद उर्फ पांड्या यांच्याकडून आणल्याचे सांगितले.

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये पोलिसांनी १३ गोवंश गुरांची सुटका केली असून, आरोपींकडून एक वाहन आणि इतर मुद्देमाल मिळून एकूण १२,०५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.


पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली स.पो.फौ. सुभाष भागणे, पो.हवा. नितीन डोमणे, पो.हवा. पालकर, पो.हवा. कदम आणि पो.हवा. प्रवीण खांबे यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.

Total Visitor Counter

2645640
Share This Article