GRAMIN SEARCH BANNER

लोटे गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; भगवान कोकरे महाराज आणि साथीदाराला अटक

Gramin Varta
2.4k Views

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; दोन दिवसांची पोलीस कोठडी

खेड (प्रतिनिधी): तालुक्यातील लोटे येथील ‘आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल’ येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर रत्नागिरी पोलीस विभागाने तात्काळ दखल घेत गुरुकुलाचा प्रमुख संशयित आरोपी भगवान कोकरे आणि त्याचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

​खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती. याच दरम्यान गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे याने मुलीसोबत अनेकदा अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला.

​पीडितेने सुरुवातीला ही घटना गुरुकुलातील एका सदस्याला सांगितली असता, त्याने याबाबत कोणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. “महाराजांची राजकीय ओळख आहे. जर कोणाला काही सांगितले, तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल,” असे सांगून तिला गप्प राहण्यास भाग पाडले. वारंवार अशा घटना घडत राहिल्याने अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांना समजला.

कुटुंबियांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर खेड पोलिसांनी संशयित आरोपी भगवान कोकरे आणि प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता आणि पोक्सो अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

​घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस आणि पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खेड पोलिसांनी तत्पर कारवाई करत संशयित आरोपी कोकरे आणि कदम यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

​धार्मिक संस्थांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने समाजात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींची गंभीर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Total Visitor Counter

2645294
Share This Article