GRAMIN SEARCH BANNER

दापोली: फत्तेगडाच्या भिंतीचा भाग कोसळला, चार घरांचे नुकसान

दापोली : तालुक्यातील हर्णे फत्तेगड परिसरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गडाच्या भिंतीचा काही भाग कोसळून मोठी दरड काेसळली. या दरडीमुळे दोन घरांना थेट धोका निर्माण झाला असून, मारुती कृष्णा पेडेकर आणि वामन शशिकांत रघुवीर यांच्या घरांसह एकूण चार घरांचे नुकसान झाले आहे.

दापोली तहसीलदार अर्चना घोलप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या कुटुंबीयांना धीर देत त्वरित स्थलांतर होण्याचा सल्ला दिला. प्रशासनाकडून एकूण २२ कुटुंबांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने गडाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडांचे अवशेष आले असून, घरांच्या भिंतीही काही प्रमाणात धोकादायक बनल्या आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खबरदारी म्हणून संबंधित कुटुंबांना तातडीने स्थलांतरित होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

फत्तेगड परिसरातील कुटुंबांच्या पुनर्वसनाचे भीजत घोंगडे

फत्तेगड परिसरात सध्या सुमारे ७० ते ८० कुटुंबे वास्तव्यास आहेत. हा परिसर भूस्खलनासाठी अतिशय संवेदनशील असल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांत दरवर्षी पावसाळ्यात गडाच्या विविध भागांमध्ये भेगा पडणे, दरडी कोसळणे आणि जमिनी खचणे यांच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे रहिवाशांना कायमस्वरूपी धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाने वेळोवेळी त्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.

किल्ल्यासह ग्रामस्थांची सुरक्षा

फत्तेगड हा ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे. त्याच्या संरक्षणासह येथे राहणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षेचाही विचार सरकारने करणे आवश्यक आहे. जोपर्यंत या कुटुंबांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत दरवर्षी अशा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Total Visitor Counter

2455558
Share This Article