दापोली : दापोली तालुक्यातील उन्हवरे, फणसू, गावतळे या परिसरातील 32 गावांतील लोकांना दापोली शहराकडे जाण्याचा नजीकचा मार्ग असणार्या आणि शिवाजीनगर, साखलोळी या दोन गावांना जोडणार्या कारिवणे नदीवरील बांधलेल्या पुलाच्या तुटलेल्या लोखंडी सळ्या थेट अपघाताला निमंत्रण देत आहेत.
त्यामुळे वाहनधारकांसाठी हा पूल धोक्याचा बनला आहे.
पुलावरील आर. सी. सी.च्या सळ्या तुटून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे. 23 सप्टेंबर 2016 रोजी या नदीवरील जुना कॉजवे कोसळला होता. त्या वेळचे तत्कालीन आमदार संजय कदम यांनी या ठिकाणी पूल बांधून लोकांची गैरसोय दूर केली होती. मात्र, त्या नंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या पुलाकडे नीट लक्ष दिले नाही. या मधल्या काळात या पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर आल्या होत्या. त्यावेळी येथील शिवाजी नगर ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर बांधकाम विभागाने वरवर मुलामा देऊन वर आलेल्या सळ्या झाकल्या होत्या.
2025 च्या पावसाळ्यात पुलावरील लोखंडी सळ्या आता तुटून वर आल्या आहेत. याठिकाणी मोठा खड्डादेखील पडला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. नजीकचा मार्ग असल्याने या पुलावरून सारखी वर्दळ असते. गणेश उत्सव सणदेखील तोंडावरच आला आहे. मात्र, अशावेळी तुटलेल्या सळ्या यामुळे अपघात होऊन रात्री अपरात्री वाहन चालकांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो.
ग्रामपंचायतीने 24 व 25 या दोन वर्षांत जिल्हा परिषद बांधकाम विभागाला या पुलाविषयी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याबाबत संबंधित खाते योग्यपद्धतीने लक्ष देताना दिसत नाही. याबाबत संबंधित खात्याने या पुलाची योग्य पद्धतीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा एक दिवस या पुलावर कुणाचा तरी जीव जाईल.
दापोली: पुलावर तुटलेल्या सळ्यांमुळे अपघाताला निमंत्रण
