राजन लाड (जैतापूर वार्ताहर)
विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना आणि प्रवाशांच्या रोजीरोटीचा प्रश्न असताना राजापूर एसटी आगाराचा बेजबाबदार व अनागोंदी कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. अधिकाऱ्यांच्या असवेदनशीलतेमुळे आज सकाळी ५ वाजता सुटणारी आंबोळगड–रत्नागिरी ही एकमेव गाडी अचानक रद्द करण्यात आली.
ही गाडी मुंबईला पाठवण्यात आल्यामुळे रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र या निर्णयामुळे या गाडीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थी, मच्छी व्यवसायिक आणि रेल्वेसाठी जाणारे प्रवासी अक्षरशः रस्त्यावर आले. प्रश्न असा की – मुंबईला गाड्या पाठवण्याचा निर्णय झाला, पण त्यामुळे गावोगावच्या प्रवाशांचे हाल झाले त्याला जबाबदार कोण?
प्रवाशांना प्रायव्हेट गाड्यांचा आधार घ्यावा लागल्याने आर्थिक भुर्दंड बसला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना वेळेत माहिती मिळावी म्हणून तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरसुद्धा कोणतीही सूचना देण्यात आली नाही. नाटेपासून कशेळीपर्यंत पहाटेपासून प्रवासी व विद्यार्थी थांब्यावर उभे होते, पण गाडी आलीच नाही.
आगाराचा फोन नेहमीप्रमाणे बंदच असल्याने प्रवाशांचा संताप आणखीनच वाढला. प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाशी खेळ करताना अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीचा पवित्रा मात्र कायम आहे.
या संदर्भात संतप्त प्रवाशांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
यापूर्वीच्या आमदारांकडून नेहमीच अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची पाठराखण झाल्यामुळे सामान्यांचे प्रश्न धाब्यावर बसले होते. पण आता लोकांमध्ये सवाल केला जात आहे की – नवीन आमदारांच्या कार्यकाळात हा बेजबाबदार कारभार थांबणार का, की प्रवासी आणि विद्यार्थी कायमच प्रशासनाच्या उदासीनतेचे बळी ठरणार?