रत्नागिरी: रत्नागिरी-गणपतीपुळे रस्त्यावरील कासारवेली मराठी शाळेसमोर भरदुपारी रस्त्याच्या कडेला वडिलांसोबत उभा असलेल्या एका आठ वर्षीय मुलाला दुचाकीवरील अज्ञात चालकाने धडक दिली. मदत न करताच तो पसार झाला. या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला असून, अज्ञात आरोपीविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी जखमी मुलाचे वडील शैलेश बाळकृष्ण वरवडकर (वय ४६, रा. कासारवेली) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी शैलेश वरवडकर हे त्यांचा मुलगा देवांश शैलेश वरवडकर (वय ०८ वर्षे) याचा हात पकडून रस्ता ओलांडण्यासाठी उभे होते.
याच वेळी रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एका अज्ञात दुचाकी चालकाने रस्त्याची परिस्थिती आणि शाळेजवळचा परिसर लक्षात न घेता बेदरकारपणे वाहन चालवले. या भरधाव दुचाकीने देवांश वरवडकर या मुलाला जोरदार ठोकर दिली, तो जखमी झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने जखमी मुलाला कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता किंवा अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून त्वरित पलायन केले.
या घटनेनंतर, दुसऱ्या दिवशी दि. २९/०९/२०२५ रोजी सायंकाळी 6.30 वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात या अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून जाणाऱ्या या अज्ञात चालकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
रत्नागिरी : कासारवेली येथे शाळेसमोरच शाळकरी मुलाला धडक देऊन फरार होणाऱ्या चालकावर गुन्हा
