GRAMIN SEARCH BANNER

पावसमधील स्वामी स्वरूपानंद मंदिरात वस्त्रसंहिता लागू, 1 जुलै पासून कडक अंमलबजावणी

रत्नागिरी: महाराष्ट्रामध्ये धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक पर्यटक चित्रविचित्र कपडे घालून धार्मिक ठिकाणी जातात. त्याचा परिणाम त्या देवस्थानच्या वातावरणावर व पावित्र्यावर होत असल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर परिसरात प्रवेश करणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी १ जुलैपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाविकांना आवाहन करण्यात आले आहे.

देशातील अनेक धार्मिक ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येकाने पारंपरिक पोशाखामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या मंदिरातील पावित्र्य राखण्याचे काम केले जाते. परंतु अनेक देवस्थानांमध्ये वेशभूषेबाबत कोणतेही नियम लागू नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात फिरणारे पर्यटक समुद्रकिनारी व अन्य ठिकाणी ज्या वेशभूषेमध्ये वावरत असतात त्याच चित्रविचित्र वेशभूषेमध्ये धार्मिक ठिकाणी जातात. त्यामुळे मंदिर परिसरात विपरित परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील देवस्थान समितीच्या माध्यमातून देवस्थानच्या ठिकाणी वेशभूषा नियमावली लागू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काही ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, परंतु काही ठिकाणी त्याची चोख अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण चांगल्या प्रकारे निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

त्यामुळे स्वामी स्वरुपानंद मंदिरातील मासिक सभेमध्ये स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळाने एकमताने ठराव करून १ जुलैपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कमी कपड्यातील ट्रीप मूड अथवा समुद्रावर जाण्यासाठी करण्यात येणारा पेहराव टाळावा, गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्टस् किंवा ड्रेसेस परिधान करू नयेत, असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे टाळावेत, अशा कपड्यांतील मंडळींना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश निषिद्ध असेल.

यासंदर्भात स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळाचे विश्वस्त डॉ. शरदचंद्र जोशी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, अनेक धर्मामध्ये त्यांच्या धार्मिक ठिकाणी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मंदिरात प्रवेश करताना महिला व पुरुष वर्गाला नियमांचे पालन करूनच दर्शनाचा लाभ घेता येतो. त्या ठिकाणी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळेच त्यांचे पावित्र्य टिकून आहे. याकरिता समाधी मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना चांगल्या तऱ्हेचे वातावरण व पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने ही वेशभूषा नियमावली लागू करण्यात आली आहे.

निर्बंध ठेवणे गरजेचे

पर्यटक चित्रविचित्र कपडे परिधान करून बिनधास्तपणे मंदिरात प्रवेश करतात. त्याचा परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होतो. या आध्यात्मिक ठिकाणी मनशांतीसाठी व प्रसन्न वातावरणासाठी येणाऱ्या भाविकांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यावर निर्बंध कायमस्वरूपी ठेवणे फार महत्त्वाचे आहे.

शरयू सुर्वे, पावस

Total Visitor Counter

2455556
Share This Article