राजापूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेले आणि राजापूर शहरात मनसेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाकडून काँग्रेसचे काम करण्याचे आदेश आल्याने आणि मनसेचे नाव वापरण्यास मज्जाव करण्यात आल्याने आपण व्यथित होऊन हा निर्णय घेत असल्याचे तांबडे यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक सविस्तर आणि भावनिक पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. अमृत तांबडे यांच्या राजीनाम्यामुळे राजापूर मनसेमध्ये खळबळ उडाली असून स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
अमृत तांबडे यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पक्ष स्थापनेपासून आपण रक्ताचे पाणी करून पक्षाचे काम केले आहे. राज साहेबांवर आपले प्रेम आजही आहे आणि कायम राहील. मात्र, स्थानिक पातळीवर बदललेल्या राजकीय समीकरणांचा फटका निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत आहे. चार दिवसांपूर्वी दत्ताराम दिवाळे यांनी आपल्याला अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्यास सांगितले होते. मात्र, आज राजू पवार यांनी आपल्याला चक्क उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस युतीचे काम करण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर मनसेचे चिन्ह किंवा पक्षाचे नाव वापरल्यास कारवाई होईल, असा दमही भरण्यात आला. ज्या पक्षासाठी आयुष्य खर्ची घातले, त्याच पक्षाकडून काँग्रेसचे काम करण्याचा आदेश मिळणे हे आपल्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे तांबडे यांनी म्हटले आहे. या आदेशामुळेच आपण आज, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी नाईलाजाने महाराष्ट्र सैनिक पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देत आहोत.
तांबडे यांनी आपल्या पत्रात पक्षाच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. २०११ मध्ये उपजिल्हाध्यक्ष वसंत आठले सर आणि तालुकाध्यक्ष सुनील जठार यांनी आपल्यावर विश्वास टाकून नगरपालिका निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी वैभव खेडेकर यांनी स्वखर्चाने एबी फॉर्म उपलब्ध करून दिले होते. राजापूरमध्ये त्यावेळी विवेक उर्फ पिंट्या गुरव वगळता कुणीही निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. अशा कठीण काळात अमृत तांबडे, प्रकाश तांबडे आणि अनंत तांबडे यांनी हिमतीने निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी मनसेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि काँग्रेसला यश मिळाले होते. त्यानंतर आजतागायत मनसेने राजापूर नगरपालिका निवडणूक लढवली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या काही वर्षांत २०२४ ची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक असो वा २०२४ ची राजापूर विधानसभा निवडणूक, आपण कुणाकडूनही एक रुपया न घेता, केवळ स्वतःच्या हिमतीवर आणि वैयक्तिक जनसंपर्काच्या जोरावर निवडणूक लढवली आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. असे असतानाही, आज पक्षाकडून काँग्रेस आघाडीचे काम करण्याचे आदेश मिळाल्याने आपण प्रचंड दुखावले गेलो आहोत. हा निर्णय कोणत्याही दबावाखाली घेतलेला नसून, केवळ तत्त्वाशी तडजोड न करण्याच्या भूमिकेतून घेतला आहे. पक्षाची आणि पदाधिकाऱ्यांची बंधने पाळणे आता शक्य नसल्याने आपण मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत आहोत, असे अमृत तांबडे यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजापुरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.







