रत्नागिरी : ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत महा ई-सेवा केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया वेग घेते आहे. यामुळे उतारे, दाखले, परवानगीपत्रे, ना हरकत प्रमाणपत्रे यांसारख्या सेवा नागरिकांना थेट आपल्या गावातच मिळणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण ८१९ ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे सुरू करण्याची तयारी झाली आहे. ग्रामपंचायतींच्या मालकीची ही केंद्रे खासगी व्यक्तींना न देता ग्रामपंचायतीकडूनच चालवावीत, असे शासनाचे निर्देश आहेत.
दरम्यान, खासगी केंद्रांसाठी डिसेंबरमध्ये काढलेल्या जाहिरातीनुसार १४८ जागांसाठी ४९७ अर्ज आले होते. त्यापैकी १०६ जागांना मंजुरी देत मंत्रालय पातळीवर आयडी तयार करण्याची शिफारस झाली आहे. पुढील दोन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण होऊन खासगी महा ई-सेवा केंद्रे सुरू होतील.
मात्र २१ ठिकाणी अर्जच आले नाहीत, तर आणखी २१ ठिकाणचे सर्व अर्ज अपात्र ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ४२ ठिकाणी केंद्रे कार्यान्वित होऊ शकणार नाहीत.
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची आधार जोडणी शंभर टक्के करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आधार जोडणीचे काम सुरू असून, आवश्यकतेनुसार आधार केंद्र चालक या शिबिरांना उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करतील. बँकांमधील आधार केंद्रांची मदतही शाळकरी विद्यार्थ्यांना होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ८१९ ग्रामपंचायतींमध्ये महा ई-सेवा केंद्रांना मंजुरी; नागरिकांना गावातच मिळणार उतारे, दाखले
