संगमेश्वर :संगमेश्वर ते शृंगारपूर – कातूर्डी मार्गावर धावणारी एस.टी. बस शनिवारी सकाळी कोंड उमरे येथील एका धोकादायक वळणावरून घसरली. काही क्षण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र प्रसंगावधान राखणाऱ्या चालकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेवेळी बस वळणावरून रस्त्याच्या कडेला घसरली होती. सुदैवाने बस खोल दरीकडे गेलेली नसून चालकाने वेळेवर नियंत्रण मिळवले आणि बस थांबवली. त्यामुळे एकाही प्रवाशाला गंभीर इजा झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून किरकोळ चुरचुर व घाबराट यापलीकडे कोणतीही हानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या मदतीमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.
दरम्यान, या अपघाताने या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघात प्रवण वळणांवर कठडे, योग्य पथदिवे, तसेच रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
एस.टी. महामंडळाने या घटनेची चौकशी सुरू केली असून, भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी मार्गाचे सुरक्षा उपाय तातडीने राबवले जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संगमेश्वर : कोंड उमरे येथे एस.टी. बस चरात फसली; मोठा अपघात टळला
