राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला राजापूर पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. राजापूर पोलिसांनी एका ‘ऑल आऊट ऑपरेशन’दरम्यान दीड लाखांहून अधिक किमतीचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले असून, एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ₹६,५७,९२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी अवैध मद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार, राजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
२५ जून २०२५ रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान ‘ऑल आऊट ऑपरेशन नाकाबंदी’ सुरू असताना, राजापूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, MH-05-FB-4152 या क्रमांकाची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी अवैधपणे गोवा बनावटीचे मद्य घेऊन जात आहे.
या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव यांच्या पथकाने एस.टी. डेपो, राजापूरसमोर नाकाबंदी केली. संशयित वाहन ताब्यात घेऊन त्याची आणि चालकाची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये ₹१,५७,९२०/- किमतीचे गोवा बनावटीचे मद्य आढळून आले.
या प्रकरणी चालक चेतक भरत वाळवे (वय २९, रा. तिवरेडांबरे, वाळवेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ₹५,००,०००/- किमतीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (क्रमांक MH-05-FB-4152) देखील जप्त करण्यात आली आहे.
एकूण ₹६,५७,९२०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालक चेतक भरत वाळवे याच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव यांच्यासह पो.उ.नि. श्री. मोबीन शेख, सपोफौ/६०८ श्री. करजवकर, म. पोहवा/१३११ श्रीमती. चव्हाण, पोकॉ/९९० श्री. रेडेकर आणि पोकॉ/१६२५ श्री. वारीक यांनी केली. अवैध मद्य वाहतुकीविरोधात पोलिसांची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.