देवरुख : मार्लेश्वर फाटा येथे शेतकरी अमोल कोळी यांच्या दोन गाभण म्हशींचा विद्युत वाहिनीच्या स्पर्शामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या म्हशींना जीव गमवावा लागला. कोळी यांना नुकसानभरपाई मिळावी व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष व देवरुखचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
कोळी यांच्या म्हशी माळरानावर चरण्यासाठी गेल्या असताना तुटून खाली पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने त्या विजेचा धक्का बसून जागीच मृत्युमुखी पडल्या. या घटनेमुळे कोळी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणामुळे महावितरणच्या व्यवस्थेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झाला.
या घटनेची माहिती मिळताच अभिजित शेट्ये यांनी घटनास्थळी भेट दिली. नंतर भाजप पदाधिकाऱ्यांसह महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राणे व सहाय्यक अभियंता खोत यांची भेट घेऊन या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली. कोळी यांना नुकसानभरपाई मिळावी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून विद्युत वाहिन्यांवर आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
या वेळी उपकार्यकारी अभियंता राणे यांनी विद्युत वाहिन्यांना ‘स्पेसर’ बसवण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठवण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी भाजप देवरुख शहराध्यक्ष सुशांत मुळे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुकाराम किर्वे, तालुका उपाध्यक्ष संदीप वेलवणकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, ज्येष्ठ सदस्य अनिल मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देवरुख : महावितरणच्या गलथान कारभारामुळे दोन गाभण म्हशींचा मृत्यू; भाजपने घेतली अधिकाऱ्यांची भेट
