रत्नागिरी:शहरातील प्रतिष्ठित गोगटे कॉलेजकडे जाणारा रस्ता सध्या ‘खड्डे की पाठशाळा’ या नावाने ओळखला जाऊ लागला आहे. इतक्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेला रस्ता पाहून नागरीकांना वाटते की, आपण गोगटे कॉलेजला नाही, तर एखाद्या ‘खड्डा संशोधन केंद्रा’कडे चाललो आहोत असा भास होतो. नगर परिषदेने चांगले दिवस दाखवले आहेत. गोगटे कॉलेजकडे जाताना शिक्षणाआधी रस्ता ओलांडण्याची परीक्षा द्यावी लागते!” असा झणझणीत टोला विद्यार्थीवर्गाकडून लगावला आहे.
या रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या आणि खोलपणा पाहता, नगर परिषद आणि ठेकेदारांची ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद व्हावी, अशी मागणी आता सोशल मीडियावरून जोर धरू लागली आहे. काही विद्यार्थ्यांनी उपरोधाने सांगितले की, “हा रस्ता ‘ऑफ रोडिंग’ शिकवणारी ‘लाइव्ह ट्रेनिंग ग्राउंड’ आहे!”
शहरातील गोगटे कॉलेजकडे जाणारा रस्ता सध्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा नव्हे, तर साहसाचा मार्ग ठरू लागला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांनी इतकी वाढ केली आहे की, रस्ता आहे की ‘रिअॅलिटी शो’ याचा ताळमेळच लागत नाही. दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचे दररोजचे रूटीन म्हणजे “कुठे खड्डा चुकवायचा, कुठे उडी मारायची आणि कपडे कसे वाचवायचे?” अशीच चाललेली धावपळ. खड्ड्यांमधून उडणारा चिखल, अंगावर उडणारे पाणी, आणि पाय घसरून होणारे थरारक अनुभव हे आता गोगटे कॉलेजच्या वाटेचे वैशिष्ट्य बनले आहे.
ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थिनी यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय आहे की, “रस्ता बनवताना नगर परिषदेने फक्त फोटोशूट केला आणि काम विसरलं की काय?” असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल झाला आहे. त्यातून वाहने चालवणे कठीण झाले असून पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालणे अशक्य झाले आहे. गाडी गेल्यावर खड्ड्यातून उडणारे चिखलाचे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असून कपडे खराब होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.
या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी गोगटे कॉलेजमध्ये शिक्षणासाठी येतात. मात्र रस्त्याची दुरवस्था पाहता शिक्षणापेक्षा अपघात टाळण्यावरच त्यांचे लक्ष अधिक केंद्रित होत आहे. काही ठिकाणी खड्डे इतके खोल आहेत की दुचाकीस्वारांचे संतुलनही बिघडते.
स्थानिक नागरिक आणि पालकांकडून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. मात्र संबंधित प्रशासन आणि नगर परिषदेने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
रत्नागिरी गोगटे कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याची भयानक स्थिती

Leave a Comment