राजापूर : मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि जिल्हा प्रशासन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ‘नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान’ अंतर्गत भव्य मोफत नेत्र तपासणी, निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांच्या विविध विकारांवर उपचार मिळणार आहेत.
या अभियानाचा मुख्य उद्देश गरीब आणि गरजू लोकांना डोळ्यांच्या आजारांवर मोफत उपचार उपलब्ध करून देणे आहे. यामध्ये प्रामुख्याने डोळ्यांची प्राथमिक तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी यांचा समावेश आहे. शिबिरात तपासणीनंतर गरजूंना मोफत चष्मे वाटप केले जाणार असून, मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियाही केली जाणार आहे. हे शिबिर आरएच रायपाटण येथे 17 सप्टेंबर रोजी होणार असून, ज्यांना डोळ्यांनी जळजळ, सूज व सतत पाणी येणे, धूसर किंवा अस्पष्ट दृष्टी, अचानक दृष्टी कमी होणे, सतत डोकेदुखी किंवा भोवती काळे वर्तुळ दिसणे, तसेच डोळ्यांवर मांस किंवा पडदे वाढलेल्या व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा. शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड/ओळखपत्र, रेशनकार्ड आणि असल्यास जुन्या तपासणीचे रिपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळणार असून, दृष्टीदोषामुळे होणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
रायपाटण येथे 17 रोजी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
