मुंबई: भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने बनावट लेटरहेड, खोटी सही आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून चक्क त्यांच्याच आवाजात कॉल करून रत्नागिरीतील अधिकाऱ्यांची फसवणूक करत ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यासाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतः आमदार लाड यांनी विधान परिषद सभागृहात ही माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील काही अधिकाऱ्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने आलेले बनावट लेटरहेड आणि खोटी सही असलेले पत्र स्वीकारले. इतकेच नव्हे तर, AI तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसाद लाड यांच्या हुबेहूब आवाजात आलेल्या फोन कॉलवर विश्वास ठेवून त्यांनी तातडीने ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी बीड जिल्ह्यासाठी वर्ग केला.
या घोटाळ्याची माहिती आमदार लाड यांना तेव्हा मिळाली जेव्हा रत्नागिरीतील एका अधिकाऱ्याला संशय आला आणि त्याने थेट लाड यांच्याशी संपर्क साधून खात्री करून घेतली. लाड यांच्याशी बोलल्यानंतर हा संपूर्ण फसणुकीचा प्रकार समोर आला. काल, मंगळवारी (१ जुलै २०२५) संध्याकाळी ४:३० वाजता हा AI द्वारे केलेला कॉल आला होता, अशी माहिती लाड यांनी दिली.
बीड जिल्हा गेल्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर येथील गुन्हेगारी आणि अनेक घोटाळ्यांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. आता आमदाराच्याच नावाचा वापर करून एवढा मोठा घोटाळा झाल्याने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा अंदाज येतो.
या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. या घोटाळ्यात चार जणांची नावे समोर आली असून, त्यापैकी एकाचे नाव बंडू असून तो सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस अधिक तपास करत असून लवकरच दोषींवर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
एआयच्या मदतीने होणाऱ्या अशा फसवणुकीच्या प्रकारांमुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.